हृदयद्रावक अपघात! मुलीला भेटून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, हायवाच्या धडकेत वडील-मुलगी ठार, पत्नी गंभीर

वैजापूर । दीपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील लाडगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हदरला. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला हायवा ट्रकने जोरदार धडक दिल्याने वडील आणि मुलगी जागीच मृत्युमुखी पडले, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास वैजापूर-लाडगाव मार्गावरील रोठी गावाजवळ ही दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे अय्युब मुनीर शाह (वय ४५) आणि त्यांची मुलगी अश्मिरा अय्युब शाह (वय १२) यांचा या अपघातात मृत्यू झाला. अय्युब यांची पत्नी अंजुब अय्युब शाह (वय ३५) गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अय्युब शहा हे मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते. ते आपल्या पत्नी आणि मुलीसह श्रीरामपूरला गेले होते. प्रवास आटोपून बोलठाण (ता. नांदगाव) येथील घरी परतत असताना, दुचाकीला (एमएच ४१ एआर ८९५५) हायवा ट्रकने (एमएच १७ बीझेड ९९९१) रोठीजवळ जोराची धडक दिली. या धडकेत अय्युब शहा ट्रकखाली चिरडले गेले आणि जागीच ठार झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अंजुब यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आणि मुलगी अश्मिराला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने अश्मिरा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत झाली. सध्या अंजुब यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर हायवा ट्रक चालकाने घटनास्थळावरून पसार होत पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला असून चालकाच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर संताप व्यक्त करत अशा बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या अपघातात एका कुटुंबाचे सर्वस्वच उद्ध्वस्त झाले आहे. घरचा कर्ता पुरुष आणि लाडकी मुलगी दोघांनाही गमावल्याने नातेवाईकांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांच्या मते, अय्युब शहा हे साधे-सरळ जीवन जगणारे होते आणि आठवडी बाजारात मसाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

वैजापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चालकाला अटक करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच नागरिकांना वाहतुकीदरम्यान नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here