लाच घेतली अन् लाज गेली... दोन हजारांची लाच घेताना तलाठी ACB च्या जाळ्यात

वैजापूर । दीपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावात बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) पथकाने सापळा रचून एक मोठी कारवाई केली. सजा कार्यालय अंचलगाव येथे कार्यरत तलाठी गोविंद रामचंद्र सबनवाड (वय ५४, रा. सुकणी, ता. उदगीर, जि. लातूर, सध्या रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांना २,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

तक्रारदार (वय ५३, रा. बाभुळतेल, ता. वैजापूर) यांनी त्यांच्या वडिलोपार्जित ५२ आर शेतीच्या फेरनोंदणीसाठी १८ सप्टेंबर २०२३ रोजी आईच्या नावाने कागदपत्रे तलाठी सबनवाड यांच्याकडे दिली होती. मात्र, फेरनोंदणीसाठी नोटीस काढून सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी त्यांनी २,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. (Vaijapur bribery case)

हे वाचलं का? – अबब! तरुणाच्या डोक्‍यावरून काढली तब्बल ४.९ किलोची गाठ, साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अवघड शस्रक्रिया करुन वाचविले प्राण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदारास तलाठ्याजवळ पाठवून पंचासमक्ष चाचणी केली असता, प्रत्यक्ष लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणी खुर्द येथील ‘श्रीकृष्ण मल्टी सर्व्हिस’ या झेरॉक्स दुकानात सापळा रचण्यात आला. तलाठ्याने तक्रारदाराकडून २,००० रुपये स्वीकारताच पोलीस पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. (Talathi caught red-handed)

झडतीदरम्यान तलाठ्याच्या अंगावरून रेडमी मोबाईल, ६३९० रुपये रोख रक्कम आणि लाचेचे २,००० रुपये हस्तगत करण्यात आले. मोबाईल जप्त करून त्याची तपासणी सुरू आहे. तसेच आरोपीच्या राहत्या घराचीही झडती सुरू असून, पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, सापळा अधिकारी पीआय वाल्मिक कोरे, पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अती. प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे, तसेच पथकातील भीमराज जीवडे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे आदींनी सहभाग घेतला. (Anti-corruption operation)

हे वाचलं का? – ‘इंटिमेट केअर’ म्हणजे लाजेची बाब नाही, ती आहे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला असून, लाचखोरीविरोधातील जनजागृती आणि प्रशासनावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra ACB news)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here