वैजापूरमध्ये ‘परदेशी क्रेझ’ कायम! वाचा, डॉ. दिनेश परदेशी यांच्या विजयाची इनसाईड स्टोरी

वैजापूर । दिपक बरकसे 

राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वैजापूर नगर परिषद निवडणुकीचा धुरळा अखेर शांत झाला असून, मतदारांनी आपला कौल स्पष्ट केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून शहराच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर सक्रिय असणाऱ्या डॉ. दिनेश पदमसिंह परदेशी यांच्यावर वैजापूरकरांनी प्रेमाचा वर्षाव करत त्यांना नगराध्यक्ष पदाच्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान केले आहे.

मागील तीस वर्षांपासून कसलीही अपेक्षा न ठेवता ‘निष्काम सेवा’ करणाऱ्या डॉ. परदेशी यांच्या पारड्यात जनतेने विजयाचे दान टाकले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताकेंद्रांना धक्का देत भाजपने मुसंडी मारली असून, शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. डॉ. परदेशी यांनी आपल्या संयमी आणि विकासोन्मुख प्रतिमेच्या जोरावर तब्बल १८,०२८ मते मिळवून विरोधकांचे तगडे आव्हान मोडीत काढले आहे.

या निवडणुकीतील सर्वात मोठी लढत भाजपचे डॉ. दिनेश परदेशी आणि शिवसेनेचे उमेदवार संजय बोरनारे यांच्यात होती. संजय बोरनारे हे विद्यमान आमदारांचे बंधू असल्याने ही निवडणूक केवळ नगर परिषदेची न राहता वैजापूरच्या राजकीय वर्चस्वाची लढाई बनली होती. मात्र, एकूण ३१,०३० मतदानांपैकी डॉ. परदेशी यांनी तब्बल ५८ टक्के मते स्वतःकडे खेचून घेत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले.

त्यांनी संजय बोरनारे यांचा ६,२४८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. शिवसेनेला या निवडणुकीत केवळ ३८ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. “ज्याचा आमदार, त्याचाच नगराध्यक्ष” हा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या शिवसेनेला मतदारांनी सपशेल नाकारल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वैजापूर शहरात आजही डॉ. परदेशी यांचीच ‘क्रेझ’ आणि निर्विवाद सत्ता असल्याचे या निकालाने अधोरेखित केले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारीवरून झालेल्या घडामोडी देखील या निकालाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. नगर परिषद नगराध्यक्ष पद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ (OBC) साठी राखीव झाल्यानंतर भाजपकडून डॉ. दिनेश परदेशी आणि दशरथ बनकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने जेव्हा डॉ. परदेशींच्या नावावर शिक्कामोर्तब केले, तेव्हा सामान्य जनतेत त्या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

याउलट, शिवसेनेने आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांना उमेदवारी दिल्याने शहरात ‘कौटुंबिक राजकारणा’ची चर्चा सुरू झाली. एकाच घरात सत्ताकेंद्र एकवटत असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली होती. मराठा उमेदवार दिल्याने झालेली नाराजी आणि अंतर्गत कलह यांचा फटका शिवसेनेला बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

प्रचारादरम्यान मुद्दे आणि प्रतिमुद्द्यांची मोठी लढाई पाहायला मिळाली. शिवसेनेने शहराच्या जलशुद्धीकरणाचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, डॉ. दिनेश परदेशी आणि त्यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी गेल्या अनेक वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत शिवसेनेच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेने मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केल्याचा दावा केला खरा, परंतु प्रचारातील विसंगती आणि स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे हा दावा मतदारांच्या पचनी पडला नाही. भाजपच्या तुलनेत शिवसेनेला प्रभागांमध्ये प्रभावी उमेदवार शोधताना देखील मोठी कसरत करावी लागली, परिणामी काही प्रभागांत त्यांना एकाच घरातील अनेक व्यक्तींना उमेदवारी द्यावी लागली, ज्यामुळे घराणेशाहीचा आरोप अधिक गडद झाला.

निवडणुकीच्या निकालात स्टार प्रचारकांचा प्रभाव देखील महत्त्वाचा ठरला. भाजपने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या तोफधडाड सभा वैजापुरात घेतल्या. या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि जनतेचा विश्वास डॉ. परदेशी यांच्यावर अधिक दृढ झाला.

याउलट, शिवसेनेकडून एकाही मोठ्या स्टार प्रचारकाची सभा वैजापुरात झाली नाही, ज्याचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे दिसून आला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रचारात केलेली काही बेताल वक्तव्ये देखील मतदारांना खटकली, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला.

या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली युती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी अकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने भाजपला भक्कम साथ दिली. या युतीचा फायदा असा झाला की, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या चार जागा जिंकल्या, तर भाजपच्या जोरावर ही संख्या १५ वर पोहोचली.

सध्या वैजापूर नगर परिषदेत भाजप-राष्ट्रवादी युतीचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिवसेनेकडे केवळ १० नगरसेवकांचे संख्याबळ उरले आहे. या समीकरणामुळे नगर परिषदेत डॉ. परदेशी यांचे कामकाज करणे अधिक सोपे होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकूणच, वैजापूर नगर परिषद निवडणुकीचा हा निकाल म्हणजे केवळ एका व्यक्तीचा विजय नसून, तो तीस वर्षांच्या निस्वार्थ सेवेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. डॉ. दिनेश परदेशी यांनी आपल्या कार्याने हे सिद्ध केले आहे की, राजकारणात गॉडफादरपेक्षा जनतेशी असलेले नाते अधिक महत्त्वाचे असते.

आता विजयाचा जल्लोष संपल्यानंतर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाची जबाबदारी डॉ. परदेशी यांच्या खांद्यावर आली आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांचे जाळे आणि शहराचे सौंदर्यीकरण या प्रश्नांवर ते येणाऱ्या काळात कशी मात करतात, याकडे आता संपूर्ण वैजापूरकरांचे लक्ष लागले आहे. पराभूत झालेल्या शिवसेनेला मात्र या निकालातून आत्मचिंतन करण्याची गरज असून, आगामी निवडणुकांसाठी नव्या रणनीतीचा विचार करावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here