
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर येथील स्टेशन रोडवरील बनकर वस्ती परिसरात शनिवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. घराजवळच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
या घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव शरद हरिभाऊ बनकर (वय ३५ वर्षे, रा. बनकर वस्ती, स्टेशन रोड, वैजापूर) असे आहे. शरद बनकर यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शरद बनकर हे शनिवारी सकाळी आपल्या घराजवळील एका झाडाची फांदी तोडण्याचे काम करत होते. फांदी तोडत असतानाच त्यांचा अनावधानाने झाडाजवळून गेलेल्या ३३ केव्ही (किलोव्होल्ट) उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाला. वीज वाहिनीला स्पर्श होताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
शरद बनकर यांना विजेचा धक्का लागल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांना त्वरित वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
घडलेल्या या आकस्मिक आणि दुर्दैवी घटनेमुळे बनकर वस्ती परिसरात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. तरुण वयात शरद बनकर यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातील वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


