
वैजापूर | दीपक बरकसे
शासकीय कार्यालयात कर्मचारी कामासाठी बाहेर गेले, सुट्टीवर आहेत अशा घटना आपण यापूर्वी पाहिल्या आहेत. परंतु, रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा संतापजनक प्रकार समोर आला असून, रुग्णांना उपचारांशिवाय घरी परतण्याची नामुष्की रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ प्राथमिक उपचार मिळावेत या हेतूने लाडगाव, मनूर, बोरसर, गाडेपिंपळगाव, शिऊर व लोणी या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अत्याधुनिक केंद्रे उभारण्यात आली होती. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ओस पडलेली आहेत.
येथील डॉक्टर मुख्यालयात न राहता रेल्वेच्या वेळापत्रकांप्रमाणे रुग्णालयाचा कारभार हाकत असल्याचे समोर आले आहे. याबाबत नेहमीच आरडा-ओरड होत असली तरी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत ही बाब पोहोचत नाही, हे विशेष. शुक्रवार (दि. २५) रोजी लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्याचा प्रकार समोर आला.
दरम्यान, एका रुग्णाच्या नातेवाईकाने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून रुग्णालयात कुणीच नसल्याची तक्रार केली असता, त्यांनी सांगितले की ते घरी असून दुसरे वैद्यकीय अधिकारी लग्नाला गेले आहेत. या संतापजनक घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतो — तालुक्यातील आरोग्य यंत्रणा नेमकी कशा पद्धतीने काम करते, हे वास्तव समोर आणणारी ही घटना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यामध्ये काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची नाही का?
तालुक्यात जवळपास सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. बहुतांश केंद्रांमध्ये डॉक्टर हे मुख्यालयात न राहता रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे ये-जा करतात. तसेच अनेक डॉक्टरांचे स्वतःचे खाजगी रुग्णालये आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये दुर्लक्षितपणा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. अशा परिस्थितीत तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई का केली जात नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे या प्रकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
रुग्णालय राम भरोसे!
दरम्यान लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी, दोन परिचारिका, एक शिपाई असे एकूण अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. एका वेळेस किमान एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असताना रुग्णालय “राम भरोसे” असल्याचे चित्र दिसून आले. कारण उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना उपस्थित कर्मचाऱ्यांकडून डॉक्टर नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या रुग्णांना उपचार न घेता तसेच घरी परतण्याची नामुष्की रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे आली.


