
वैजापूर । दिपक बरकसे
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम शांत होत नाहीत तोच वैजापूर तालुक्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घवघवीत यश संपादन केलेले असतानाच, आता त्यांच्याच ताब्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल १३ विरुद्ध शून्य अशा मताधिक्याने मंजूर करण्यात आला आहे. ऐन विजयाच्या जल्लोषात आमदार बोरनारे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती हे ग्रामीण राजकारणाचे शक्तिपीठ मानले जाते. गेल्या काही काळापासून सभापती रामहरी बापू जाधव हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याची तक्रार काही संचालकांनी केली होती. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभापतींच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या १३ संचालकांनी एकत्र येत प्रशासनाकडे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार, बुधवारी (दि. ११) बाजार समितीच्या कार्यालयात या संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी सकाळी बाजार समिती परिसरात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेला सहाय्यक उपनिबंधक चौधरी, सचिव मोटे आणि सहसचिव निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेची प्रक्रिया सुरू होताच उपस्थित १३ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने आपले हात उंचावून कौल दिला. विशेष म्हणजे, या ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही, तर खुद्द सभापती रामहरी बापू जाधव यांच्यासह एकूण ५ संचालक या सभेला गैरहजर राहिले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी वैजापूर पोलिसांनी बाजार समिती परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या संचालकांमध्ये शिवकन्या मधुकर पवार, काकासाहेब रामकृष्ण पाटील, अविनाश अशोकराव गलांडे, कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे, ज्ञानेश्वर नारायण जगताप, अनिता देविदास वाणी, प्रशांत दादासाहेब सदाफळ, रजनीकांत रामनाथ नजन, गणेश पोपटराव इंगळे, प्रशांत उत्तमराव त्रिभुवन, विजय विश्राम ठोंबरे, शेख रियाज शेख अकील आणि बाबासाहेब दगू गायकवाड यांचा समावेश आहे. दुसरीकडे, रामहरीबापू जाधव यांच्यासह संजय निकम, कल्याणराव जगताप, प्रवीण पवार आणि गोरख आहेर हे संचालक सभेला अनुपस्थित होते.
या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना पदच्युत सभापती रामहरी बापू जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी हा ठराव म्हणजे राजकीय सूडबुद्धीने रचलेला कट असल्याचे म्हटले आहे. जाधव म्हणाले की, “वाकला सर्कलची जागा भाजपला सुटलेली असतानाही मी तिथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, याचाच राग मनात धरून भाजपने माझ्या विरोधात हा अविश्वास ठराव आणला आहे. माझ्या कार्यकाळात बाजार समितीने अभूतपूर्व प्रगती केली आहे. समितीकडे ७ कोटींच्या ठेवी असून, १० एकर जागा आणि विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीने पैसे देण्याचा ऐतिहासिक निर्णयही माझ्याच काळात झाला. आमदार साहेबांनी दिलेल्या संधीचे मी सोने केले असून शेतकऱ्यांची सेवा केल्याचे मला समाधान आहे.”
या राजकीय घडामोडीमुळे वैजापूरमधील सत्तासंघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी काळात बाजार समितीच्या नव्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आमदार रमेश बोरनारे या धक्क्यातून सावरून कोणती नवी रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



