
वैजापूर । दिपक बरकसे
सहकार क्षेत्रात आदर्श पायंडा पाडत वैजापूर येथील उत्कर्ष शिक्षक सहकारी पतसंस्थेची नूतन पदाधिकारी निवड अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या विशेष सभेत संस्थेच्या सर्वच प्रमुख पदांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
ही निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वैजापूर येथील किरण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत कोणताही विरोध न होता सर्व पदाधिकारी एकमताने निवडले गेले. यामध्ये पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अंजुम पठाण सर यांची पुन्हा एकदा चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा पतसंस्थेला पुढील काळात निश्चितच फायदा होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तर व्हाईस चेअरमनपदी संतोष कवडे पाटील आणि सचिवपदी संतोष बरबंडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांवर संचालक मंडळाने विश्वास टाकत संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सोपवली आहे. पतसंस्थेच्या आर्थिक शिस्तीला आणि सदस्याभिमुख कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या निवडप्रसंगी संचालक मंडळातील संजय गायकवाड, नंदकिशोर बडग, ज्ञानेश्वर वाळुंज, लक्ष्मण नरसिंगे, अशोक दारवंटे, मल्लिकार्जुन बबछेडे, भाऊसाहेब थोरात, राहुल चौधरी, श्रीमती साधना शेवंते, श्रीमती सुनंदा बनसोडे, श्रीमती छाया वालतुरे आणि श्रीमती वैशाली बलांडे हे सर्व उपस्थित होते.
निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी व संचालकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सहकाराच्या माध्यमातून शिक्षक आणि सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शांततापूर्ण आणि बिनविरोध पार पडलेली ही निवड वैजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


