
वैजापूर । दीपक बरकसे
महावितरणच्या नागमठाण शाखेचे शाखा अभियंता नवनाथ दादा बेळे यांची बदली राजकीय दबावापोटी पुन्हा होऊ नये, यासाठी नागमठाण, भालगाव, गाढेपिंपळगाव, आणि इतर अनेक गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयाला निवेदन दिले आहे. त्यांच्या मागणीचे निवेदन महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना सादर करण्यात आले असून, यात बेळे साहेबांच्या कामाची प्रशंसा करत, त्यांची बदली थांबवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळे यांची बदली जून महिन्यात नागमठाण शाखेतून जालन्याला करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा नागमठाण येथेच परत बोलावण्यात आले. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कामामुळे वीजचोरी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे काही वीजचोरांनी राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येऊन आवाज उठवला असून, त्यांनी बेळे साहेबांना पाठिंबा दिला आहे.
निवेदनानुसार, बेळे नागमठाण शाखेत रुजू झाल्यापासून वीजपुरवठा अधिक सुरळीत आणि अखंडित झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कर्मचारी वर्गही अधिक कार्यक्षम झाला असून, कोणतीही तातडीची अडचण आल्यास ते तात्काळ उपलब्ध होतात. यामुळे शेती आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, तक्रार करणाऱ्यांच्या घरात वीज जोडणी आहे की नाही, त्यांच्याकडील शेतीपंपांची तपासणी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या मागणी पत्रावर नागमठाण, चांदेगाव, भालगाव, चेंडूफळ, गाढेपिंपळगाव, सराला, महांकाळ वाडगाव, अव्वलगाव/हमरापूर, आणि भामाठाण यासह अनेक ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर अभियंता बेळे यांची पुन्हा बदली झाली तर तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या अन्यायाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. एकंदरीत, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकता प्रेरणादायी असून, महावितरण प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



