
वैजापूर । दिपक बरकसे
गंगापूर रोडवरील चोरवाघलगाव शिवारात आज (रविवार) सकाळी एका भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे हनिफाबी अलीम सय्यद (वय 45) आणि अलीम कमरुद्दीन सय्यद (वय 50) अशी आहेत. हे दोघेही गंगापूर येथील टकिया भागातील रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, अलीम शहा आणि हनिफा शहा हे दोघेही म्हस्की येथे त्यांच्या एका नातेवाईकाच्या मौती जात होते. गंगापूर रोडवर चोरवाघलगाव शिवाराजवळ असताना एका अज्ञात आणि भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, या धडकेत पती-पत्नी असलेल्या या दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आमदार रमेश बोरनारे आणि आसरा फाउंडेशनचे वाहेद पठाण यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्तांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर हनिफाबी आणि अलीम सय्यद यांना मृत घोषित केले.
या मदतकार्यात संजय बोरनारे, आमीर अली, महेश बुणगे, अजिंक्य बोरनारे आणि रामचंद्र पिलदे या नागरिकांनी देखील मोलाची मदत केली आणि माणुसकीचे दर्शन घडवले. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे प्रवीण अभंग, सागर शिंदे आणि अजय बावस्कर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघाताचा सविस्तर पंचनामा केला आहे. या प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



