वैजापूर । दीपक बरकसे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात बुधवारी मध्यरात्री एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रात्री १ ते १:३० वाजेच्या सुमारास स्टीलचे अवजड रोल वाहून नेणारा एक ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक पलटी होताच त्यातील अजस्त्र स्टीलचे रोल्स रस्त्यावर विखुरले गेले. मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजस्थानहून आलेला आणि गंगापूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक (RJ 19 CH 4535) हा भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वळणावर हा अवजड ट्रक थेट रस्त्यावर आडवा झाला. ट्रक पलटी होताच झालेल्या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरिक गाढ झोपेतून जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात रफिक खा (वय ३२) आणि लडूराम (वय १७), (दोन्ही राहणार जोधपूर, राजस्थान) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने ट्रकबाहेर काढले आणि उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची गंभीरता लक्षात घेता, वैजापूर नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा तातडीने सक्रीय झाली. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष शेख रियाज, साबेर खान, नगरसेवक दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, सुलतान खान, आमिर अली, पत्रकार सुनील त्रिभुवन, आरपीआयचे नेते बाळासाहेब त्रिभुवन, जुबेर चाऊस, अकील कुरेशी, आवेज खान, मयूर राजपूत यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग नोंदवला. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते, ज्यामुळे इतर वाहने घसरून दुसरा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि पाण्याचा फवारा मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला.

वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने वाहतूक नियंत्रण हाती घेतले. रस्त्याच्या मध्यभागी पडलेले ते अवजड स्टीलचे रोल हटवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. अखेर दोन मोठ्या क्रेन पाचारण करून अत्यंत कष्टाने हे रोल बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, या घटनेने शहरातील जड वाहतुकीचा आणि वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मुख्य चौकातील सुरक्षा उपाययोजनांबाबत नागरिक चर्चा करत आहेत.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here