
वैजापूर । दिपक बरकसे
शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले, तरी भ्रष्टाचाराची वाळवी शासकीय यंत्रणेला पोखरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचा वरदहस्त असल्याचा आव आणत, एका खासगी लिपिकाने कर्ज प्रकरणातील कारवाई टाळण्यासाठी मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्याला रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण थरारक कारवाई छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्सप्रेस’मध्ये पार पडली. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या खासगी इसमांच्या आणि दलालांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तक्रारदार तरुणाने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ योजनेअंतर्गत देवगिरी बँकेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्यवसायातील चढ-उतारामुळे कर्जाचे काही हप्ते थकले होते. या थकबाकीमुळे देवगिरी नागरी सहकारी बँकेने तक्रारदारावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५६ नुसार जप्तीची आणि कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली होती. या नोटिसीवर कोणतीही कारवाई होऊ नये, आपले म्हणणे उप-निबंधक कार्यालयात व्यवस्थित मांडले जावे आणि थकलेल्या हप्त्यांसाठी वाढीव मुदत मिळावी, यासाठी तक्रारदार प्रयत्नशील होता.
लिपिकाचा भ्रष्ट डाव आणि फोन-पे वर लाचेचा ‘श्रीगणेशा’ या सर्व प्रक्रियेत मध्यस्थीची भूमिका बजावत पडेगाव येथील उप-निबंधक सहकारी संस्था (परसेवा) कार्यालयातील ‘मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन’ येथे कार्यरत असलेला खासगी लिपिक सागर कारभारी जाधव (वय ३२ वर्ष) याने तक्रारदाराला मदतीचे आमिष दाखवले. या कामासाठी त्याने चक्क १२,००० रुपयांची लाचेची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, भ्रष्टाचाराचा हा व्यवहार इतका उघड होता की, आरोपी सागर जाधव याने यापूर्वीच २,००० रुपये ‘फोन-पे’ या डिजिटल वॉलेटद्वारे स्वीकारले होते. मात्र, उर्वरित १०,००० रुपयांसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. तक्रारदाराला ही लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तपोवन एक्सप्रेसमध्ये रचला सापळा तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पडताळणी सुरू केली. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपी सागर जाधव याने वरिष्ठांवर आपला प्रभाव असल्याचे सांगून १०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाच घेण्याचे ठिकाण ठरले होते ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’. आरोपीने अत्यंत चपळाईने तपोवन एक्सप्रेसच्या डब्यात ही रक्कम घेण्याचे ठरवले जेणेकरून गर्दीचा फायदा घेता येईल. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रेल्वे स्थानकावर आधीच सापळा रचला होता. तपोवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी असताना, तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून सागर जाधव याला ताब्यात घेतले.
अंगझडतीत सापडला मुद्देमाल एसीबीच्या पथकाने आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे लाचेची १०,००० रुपयांची रक्कम, त्याचे स्वतःचे १,०५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीच्या वैजापूर येथील राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस उप-अधीक्षक संगीता पाटील, तपास अधिकारी संतोष तिगोटे आणि त्यांच्या पथकातील राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, सी.एन. बागुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भ्रष्टाचाराविरोधात कडक पाऊल सरकारी कार्यालयांत ‘आउटसोर्सिंग’ किंवा खासगी पद्धतीने काम करणाऱ्या इसमांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. आजच्या कारवाईने अशा प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे. आरोपी सागर जाधव याच्याविरुद्ध रेल्वे पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यास न्याय मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
एसीबीचे नागरिकांना आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या निमित्ताने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी, अधिकार्याने किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास त्याला बळी पडू नका. अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती तात्काळ एसीबीच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७७२०८९१०६४ वर द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय राखून भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा विश्वास विभागाने दिला आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



