
देशात २००० रुपयांच्या गुलाबी नोटांचे प्रेम काही कमी झाले नाही. या नोटा बाजारातून बाद होऊन जवळपास दीड वर्षे लोटले तरी काही जणांनी या नोटा दडवून ठेवल्या आहेत.
बाजारातून मोठ्या प्रमाणात या नोटा बँकांमध्ये लोकांनी जमा केल्या. पण काही लोकांना या नोटांचा मोह काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ताज्या आकडेवारीत यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार, या नोटा चलनातून बाद करून सुद्धा अजून ६६९१ कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारातच आहेत.
हे वाचलं का? – जळगावात ‘थर्टी फस्ट’च्या रात्री राडा! पालधी गावात दगडफेक आणि जाळपोळ… नेमकं काय घडलं?
रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जनतेने एकूण वितरित केलेल्या ९८.१२% इतक्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत केल्या आहेत. मात्र अजूनही ६६९१ कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा जनतेकडे आहेत.त्या परत घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
१९ मे २०२३ मध्ये रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी व्यवहारात साधारणपणे ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. आता फक्त ६,६९१ कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोणत्याही बँक शाखेत या नोटा परत करता येत होत्या.
हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
त्यानंतर रिझर्व बँकेच्या १९ कार्यालयामध्ये या नोटा परत करता येत आहेत. कोणत्याही पोस्ट कार्यालयातून नागरिक या नोटा रिझर्व बँकेच्या संबंधित कार्यालयाकडे पाठवू शकतात. केंद्र सरकारने नोटबंदीनंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजार रुपयाची नोट सुरू केली होती. त्या अगोदर १,००० आणि ५०० रुपयाची जुनी नोट बंद करण्यात आली होती. उरलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा लवकरच परत येतील असे रिझर्व बँकेने म्हटले आहे.


