जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव असलेल्या कुंभमेळ्याला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील संगमावर होत असलेल्या या महाकुंभासाठी ४० कोटी भाविक येतील, असा अंदाज आहे. सोमवारच्या पहिल्या शाही स्नानाने या कुंभमेळ्याला प्रारंभ होईल आणि २६ फेब्रुवारी रोजी त्याचा समारोप होईल. धर्म, ज्ञान, भक्ती, श्रद्धा यांचा संगम असलेला यंदाचा ४५ दिवसीय कुंभमेळा एकतेचा महाकुंभ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. कुंभमेळा दर बारा वर्षांनी येत असला, तरी ग्रह-नक्षत्रांची दुर्मीळ युती असलेल्या यंदाच्या महाकुंभाची पर्वणी तब्बल १४४ वर्षांनंतर आली आहे. गंगा, यमुना आणि पुराणातील सरस्वती नदीच्या संगमावरील १० हजार एकरांवर कुंभनगरी वसली आहे. संगमस्थळी सर्व १३ आखाड्यांच्या छावण्या उभारल्या असून, सोमवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर पहिल्या शाही स्नानासह महाकुंभाला सुरुवात होईल. शाही स्नानाच्या एकूण सहा पर्वण्या आहेत. परंतु, शाही स्नान सुरू होण्यापूर्वीच शनिवार-रविवार या दोन दिवसांत सुमारे ४० लाख भाविकांनी स्नान केल्याचे प्रशासनाने सांगितले.

आबालवृद्धांसह युवकांचा उत्साह मोठा होता. ‘दिव्य कुंभ, भव्य कुंभ, डिजिटल महाकुंभ’ हे यंदाच्या कुंभमेळ्याचे घोषवाक्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सज्ज अॅपद्वारे कुंभमेळ्याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. येणाऱ्या भाविकांसाठी १ लाख ६० हजार तंबू उभारण्यात आले आहेत. यामध्ये झोपडी, राहुट्यांसारख्या साधारण तंबूंसह पंचतारांकित सुविधा असलेल्या आलिशान तंबूंचा समावेश आहे. एकावेळी ५० लाख ते १ कोटी लोक या कुंभनगरीत राहू शकतात. देश-विदेशातील ४० कोटी भाविक येतील, असा अंदाज आहे.

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी संगमावर काही घाट नव्याने बांधण्यात आले आहेत. घाटांची एकूण लांबी ८ किमीवरून १२ किमी झाली आहे. कपडे बदलण्यासाठी किनाऱ्यांवर तसेच नदीच्या पात्रातदेखील तरंगत्या चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. ‘सुरक्षित कुंभ’च्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत यंदा प्रथमच पाण्याखालील ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन पाण्याखाली १०० मीटर खोलीवर २४ तास कार्यरत राहण्यास सक्षम आहेत. स्थानिक पोलीस, निमलष्करी दल, एनएसजी कमांडो यांचा समावेश असलेले हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

संपूर्ण कुंभनगरीवर तीन हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. एआय तंत्रज्ञानाने सज्ज या कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास मदत होणार आहे. कुंभमेळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, एकाचवेळी १५ हजार स्वच्छता कर्मचारी कार्यरत असतील. भाविकांना वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने ३००हून अधिक विशेष गाड्यांची तर उत्तर प्रदेश परिवहन विभागाने ७ हजार बसेस तयार ठेवल्या आहेत. कुंभनगरीत येण्या-जाण्यासाठी ५५० शटल बसची मोफत सेवा असेल.

या महाकुंभ मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

किती शाही स्नान होणार? तारीख काय?

प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिला शाही स्नान १३ जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे. तर दुसरं शाही स्नान १४ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल. तर चौथं स्नान २ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचं शाही स्नान २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here