कांदा फसवणूक प्रकरणाबाबत मोठा खुलासा; चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल, बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे...

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मे. साईबालाजी ट्रेडिंग कंपनीच्या सागर राजपूत या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम न भरता मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी बाजार समितीची चौकशी करण्याची मागणी केली होती. सहाय्यक निबंधक यांनी सादर केलेल्या अहवालात बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे ही फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकशी अहवालानुसार, बाजार समितीने वेळोवेळी व्यापाऱ्याच्या व्यवहारांची तपासणी केली नाही. त्यामुळे मार्केट फी आणि सुपरव्हिजन फी वेळेत वसूल केली गेली नाही. या व्यापाऱ्याने पाच महिने उशिराने कर भरला असतानाही बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, समितीचे १२ लाख ६६ हजार ३०५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ३१(३) आणि नियम २०(ब) नुसार व्यापाऱ्याने मार्केट फी त्वरित भरणे आवश्यक आहे. मात्र, बाजार समितीने शुल्क वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तसेच, कलम २९ (२०) आणि नियम २०(३) नुसार समितीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक तपासणीही केलेली नाही.

या अहवालानंतर शेतकऱ्यांनी आमदार बोरनारे यांची भेट घेतली. त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी विशेष बाब करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ते म्हणाले.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

शेतकऱ्यांनी सागर राजपूत आणि बाजार समितीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बाजार समितीने व्यापाऱ्याकडून लाखोंची थकीत रक्कम असतानाही त्याला व्यापार करण्याची परवानगी दिली. सप्टेंबर २०२४ मध्ये ६.४६ लाख आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ६.१९ लाख इतकी रक्कम थकीत होती, तरीही बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नाही, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. बाजार समितीची निष्क्रियता आणि व्यापाऱ्याचा अपहार यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here