प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली, नावही बदललं!

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सहभागी होऊन अध्यात्माकडे वळली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर ममता कुलकर्णीने संन्यास घेतला.

ममता कुलकर्णी आता अभिनेत्री म्हणून नव्हे, तर महामंडलेश्वर म्हणून ओळखली जाईल. २५ वर्षांनंतर ममता भारतात महाकुंभासाठी परतली आहे . प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभात ती भगव्या वेशात दिसली. तिच्या कपाळावर चंदनाचा गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर झोळी होती.

ती किन्नर आखाड्यात पोहोचली आणि तिने आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. ममता कुलकर्णीने संन्यास घेऊन किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर होण्याचा विधी पूर्ण केला. साध्वी झाल्यानंतर ममता कुलकर्णीला नवीन नाव देण्यात आलं आहे. ती आता श्री यामाई ममता नंद गिरि या नावाने ओळखली जाणार आहे.

काय आहे किन्नर आखाडा?

किन्नर आखाड्याची स्थापना २०१५ साली करण्यात आली. ही एक हिंदू धर्माची संघटना आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. आता ममता कुलकर्णीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगानं पसरवण्यासाठी मदत होणार आहे.

हे वाचलं का? – छावा चित्रपटाला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी… शंभूराजे अन् येसूबाईंच्या ‘या’ सीनमुळे वाद पेटला

दरम्यान, ममता कुलर्णीने संन्यास घेतल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीची चाहत्यांमध्ये फार मोठी क्रेझ होती. ‘तिरंगा’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. ममता चाहत्यांमध्ये फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर, सौंदर्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली.

ममता कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत राहिली आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ममताने ‘तिरंगा’ शिवाय, ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा हैं’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.. तिला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं, कारण तिने अनेक चित्रपटांची ऑफर धुडकावून लावली होती.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here