
नव्या वर्षात विविध निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा, पालिका, झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच ग्रामपंचायती आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका कोणत्याहीक्षणी जाहीर होणार आहे.
राज्य सरकारनं राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती दिली होती. त्याची मुदत संपत असल्यानं नव्या वर्षात म्हणजे १ जानेवारी २०२५ पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्यानं, निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागानं निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत.
हे वाचलं का? – गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचे दर कडाडणार?
राज्यातील सहकारी साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समित्या, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, प्रशासक, प्रशासक मंडळ नियुक्त केलेल्या सहकारी संस्था, हंगाम समितीचा कालावधी संपुष्टात आलेल्या सहकारी संस्था यांच्या निवडणूक प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. त्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यात येणार नाहीत.
दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. सुरुवातीला करोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत.
हे वाचलं का? – प्रियंका गांधींनी केलं अमित शाहांचं कौतुक; आभारही मानले
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी, या दृष्टीने महायुतीतील पक्षांनी तयारीचे प्रयत्न सुरू केलेत. तर दुसरीकडे, विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.
निवडणुकीला अद्याप घोषित झाल्या नसल्या इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील अनेकदा निवडणुका लागतील. त्यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, निवडणुका वारंवार काही कारणास्तव लांबणीवर गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यात आता पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागल्याने इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात केली आहे.


