
दिल्ली विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा केली आहे.
पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून, ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात हे मतदान होणार असून सर्व देशाचे याकडे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत आले. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.
खरंतर आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाल्याचं दिसून येतं आहे. अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन दिल्लीचं राजकारण तापलेलं पाहण्यास मिळालं. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहल या घरावरुन मोदी आणि अमित शाह हे सातत्याने केजरीवालांवर टीका कत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.
दिल्ली विधानसभेची निवडणूक आप या पक्षाने सलग दोनवेळा जिंकली आहे. भाजपाला ‘दिल्ली’ काबीज करायची आहे. त्यामुळे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात जावं लागल्याने त्यांनी आता लोक निवडून देतील तेव्हाच मी मुख्यमंत्री होईन असं म्हणत आतिशी यांना ते पद दिलं. या दरम्यान काँग्रेस आणि आप बरोबर आहेत असं वाटत असतानाच अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं. दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हे वाचलं का? – घसघशीत ‘रिटर्न्स’ मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ! आयुष्यभराची जमापुंजी गेली
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास गेल्या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के मते मिळाली होती. भाजपला ३८.५१ टक्के मते तर काँग्रेसला ४ टक्के मते मिळली होती. त्याआधी २०१५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या.
- दिल्ली विधानसभेच्या एकूण जागा- 70
- ५८ सर्वसाधारण जागा, १२ राखीव जागा
- १३ हजार ३३ मतदान केंद्रांची निर्मिती
- सरकार स्थापनेसाठी ३६ जागांची गरज
- दिल्लीतील एकूण मतदार- १.५५ कोटी
- प्रथमच मतदार करणारे- २.०८ लाख
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १७ जानेवारी
- अर्ज माघार घेण्याचा दिवस-२०जानेवारी
- मतदानाची तारीख-५ फेब्रुवारी
- निकाल- ८ फेब्रुवारी
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


