
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
मात्र, यातही अद्याप काही महिलांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता निकष लावण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता ज्या बहीणी योजनेच्या निकषात बसत नाही त्यांचा लाड सरकार करणार नसल्याचं दिसत आहे. (Ladki Bahin Yojna News)
दरम्यान धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे ७५०० रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आत्तापर्यंत देण्यात आलेले ५ महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकारजमा करण्यात आले.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
लाडकीच्या अपात्रतेचे निकष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त
- कुटुंबात कुणाच्या नावावरही चारचाकी वाहन नको
- शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र
- इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार
- लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही
राज्यभरातून २ कोटी ६३ लाख लाडक्या बहीणींनी अर्ज दाखल केले होते.. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरलेत.. मात्र आता नव्याने छाननी सुरु झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहीणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहीणी अपात्र ठरणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का? – फायनान्स कंपनीच्या वसूली एजंटचा धुमाकूळ, हफ्ता भरला नाही म्हणून शेतमजूरावर तलवारीने हल्ला
याच दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलं आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना आणि लाडकी बहीण योजना असा कोणता लाभ घेता येईल किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं की, एका वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. हा नियम आहे. त्यामुळे महिलांनी हा निर्णय घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे त्यांनी ठरवायचं आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला घेत असतील तर शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वजा होतील, असा काही निर्णय झालेला आहे का? असं विचारलं असता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, असा निर्णय झालेला नाही. मात्र, दोन्ही पैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा, असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं. कोकाटे पुढे म्हणाले, सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का? नाही घेता येत. एक शेतकरी एकाच जमीनीवर दोन बँकेकडून कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम या ठिकाणीही लागू होतील. योजना वेगळ्या असल्या तरीही. अन्यथा दोन योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील असा जीआर सरकारला काढावा लागेल, असंही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



