धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार, दिवसही ठरला? जवळच्या व्यक्तीची पोस्ट, चर्चेला उधाण

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तब्बल १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार, हत्येचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिकच तीव्र झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यातच त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

त्यातच आता धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच झालेला आहे, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे.

हे वाचलं का? – वैजापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ! तालुक्यातून ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

करुणा शर्मा यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या.

मला १०० टक्के असं वाटतंय की अधिवेशनाआधी अजित पवार स्वत: राजीनामाबद्दलची घोषणा करतील. अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देतील. आता धनंजय मुंडेंकडे बोलण्यासारखे काहीही राहिलेले नाही. वाल्मिक कराड हा त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती आहे. आपण त्याला त्यांची सावली असं म्हणू शकतो. त्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंच्या पोटाचे पाणी हलत नाही. त्यामुळे ही १०० टक्के खरी गोष्ट आहे.

धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की कोणीही दोषी असेल तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड जेव्हा सरेंडर झाला तेव्हा संतोष देशमुख हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी, असे म्हटले होते. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येमुळे लोकांच्या मनात खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडकडून लोकांना गुंड प्रवृत्तीत परिवर्तन करायचं काम सुरु होतं. जे १० लोक आहेत, त्यात वाल्मिक कराड जे आका आहेत, त्यांचं वय हे जास्त आहे. बाकी सर्वजण २६, २७ अशा तरुण वयातील मुलं आहेत. यांची खूप मोठी टोळी आहे.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

माझं धनंजय मुंडेंसोबत काहीही बोलणं झालं नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनतेने जे आक्रमक रुप घेतलेलं आहे. पण तरीही राजीनामा व्हायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पण मला देवेंद्र भाऊंवर पूर्ण विश्वास आहे. याप्रकरणाची चौकशी इतक्या चांगल्या पद्धतीने सुरु आहे. एसआयटी, सीबीआय यांना चौकशीत चांगले यश मिळालेले आहे. वाल्मिक कराड हा जो खरा आका होता, पुण्यातील एका डॉनलाही अटक झाली. त्यामुळे देवेंद्र भाऊंचे खूप चांगले काम सुरु आहे. यासाठी मी त्यांची कौतुक करते.

दरम्यान, CID ने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडच आहे. कराडवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तरीसुद्धा त्याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव वाढला आहे.

हे वाचलं का? – अंजली दमानीयांचा मुंडेंवर पुन्हा एक नवा आरोप; धनंजय मुंडेंचाही पलटवार म्हणाले, “अर्धवट ज्ञानाच्या आधारे…”

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले आहे. जर सोमवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही आंदोलन करू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा निश्चित असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. CID च्या अहवालानंतर आणि विरोधकांच्या वाढत्या आक्रमक भूमिकेमुळे मुंडेंच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संभ्रम वाढला आहे. सोमवारी होणाऱ्या अधिवेशनाआधीच त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here