अंजली दमानीयांचा मुंडेंवर पुन्हा एक नवा आरोप; धनंजय मुंडेंचाही पलटवार म्हणाले, "अर्धवट ज्ञानाच्या आधारे..."

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यांनी धनंजय मुंडे यांना भ्रष्टाचारी ठरवत त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील आणखी एका कथित घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी “इफको” (IFCO) मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून बनावट आदेश काढले आणि 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. याआधी 342 कोटींचा घोटाळा समोर आला होता, आणि आता हा अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांनी असा दावा केला की, इफकोमधील अनेक गैरव्यवहारांबाबत आधीच लोकसभा आणि राज्यसभेत प्रश्न विचारले गेले आहेत, तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. तरीही धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी सही केलेल्या एका पत्राचा उल्लेख करत सांगितले की, या पत्रावर कोणतीही तारीख नव्हती. 23 आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त नोंदवण्यात आले नाही. तरीही धनंजय मुंडे यांनी खोट्या आदेशाद्वारे कार्यवाही केल्याचा आरोप त्यांनी केला.

दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत सांगितले की, “जर भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होत नसेल, तर राज्यातील शेतकऱ्यांनी या सरकारकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले नसताना देखील बनावट अध्यादेश काढले गेले.

या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “शासनाच्या कार्य नियमावलीनुसार (Rules of Business) जीआर निर्गमित करण्याची एक ठरलेली प्रक्रिया असते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच आदेश काढले जातात.” त्यामुळे खोटे बोलून जीआर काढल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, “दमानिया यांनी गेल्या 15 वर्षांत ज्या व्यक्तींवर आरोप केले, त्यातील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांचे आरोप हे अर्धवट माहितीच्या आधारे केले जात आहेत.” तसेच, त्यांनी असेही म्हटले की, “जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.”

धनंजय मुंडे यांनी फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरचा संदर्भ देत स्पष्ट केले की, “खते विक्रीसाठी केंद्र सरकारच्या नियमांनुसार प्रमाणपत्र आवश्यक असते. 2022 आणि 2023 मध्येच इफकोने संबंधित कंपन्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्यामुळे इफको घोटाळ्याचा मुद्दा केवळ दिशाभूल करण्यासाठी उपस्थित केला जात आहे.”

अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल, तसेच यावर सरकार कोणती कारवाई करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here