
अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबुन खुन करणाऱ्यास वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस के. उपाध्याय यांनी जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आनंद सुरेश लोखंडे (वय ३०, रा. पवननगर, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाची घटना २० जुलै २०१९ रोजी सकाळी साडे दहा वाजल्याच्या सुमारास वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव शेणपुंजी येथे घडली होती.
हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या
या खटल्याची अधिक माहिती अशी कि, आरोपी आनंद सुरेश लोखंडे हा आपले आई वडील, पत्नी ममता व दोन मुले प्रज्ञा व संघर्ष यांच्यासह रांजणगाव शेणपुंजी येथे राहत होता व मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. घटनेच्यापुर्वी ८ जुलै रोजी ममता मुकुंदवाडी भागात राहत असतांना आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन घरातुन निघुन गेली होती. याबाबत आनंद याने पोलिसांत फिर्याद दिली होती.
आरोपी आनंद याने तिचा शोध घेतला असता ममता ही नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे त्यांच्या घरासमोर राहत असलेला मुलगा प्रमोद खनपटे (रा. मुकुंदवाडी) यांच्या सोबत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर आरोपी आनंद हा आई वडील पत्नी ममता व दोन मुलांना घेऊन रांजणगाव येथे राहु लागला. २० जुलै रोजी आनंद याची आई मुलांना सोडवण्यासाठी अंगणवाडीत गेली होती.
हे वाचलं का? – स्की रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! किमान ६६ जणांचा होरपळून अंत, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या
वडील घरात होते. त्यावेळी आनंद व ममता यांच्यात पळवुन गेल्याच्या कारणावरुन भांडण झाले. रागाच्या भरात आनंद याने ममता हिस खाली पाडुन तिचा गळा दाबला. तसेच जिवंत राहु नये म्हणुन तिच्या गळ्यावर पायाने दाब दिला. हा खटला वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. अंमलदार व्ही.डी. चासकर यांनी गुन्ह्याचा तपास केला.
सुनावणीच्या वेळी सरकार पक्षाने एकुण दहा साक्षीदार तपासले. सरकारी वकिल नानासाहेब जगताप यांनी साक्षी पुराव्या दरम्यान आलेला पुरावा न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देत आनंद लोखंडे यानेच पत्नी ममता हीचा अनैतिक संबंधांच्या संशयावरुन खुन केला आहे हे सिद्ध केले. म्हणुन न्यायाधीश एस.के. उपाध्याय यांनी आरोपीस जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी दत्तात्रय गवळी यांनी सहकार्य केले.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


