
कधी जुन्या भांडणाचा राग, कधी विवाहबाह्य संबंधांमुळे हत्या तर कधी आणखी काही…गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात दिवसढवळ्या खून, हत्या होण्याची प्रकरणं वाढतच असून त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण चांगलंच वाढलंय. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न पडावेत अशाच या घटनांनी सामान्य नागरिक मात्र हादरले आहेत. अशीच एक हादरवणारी घटना जळगावमध्येही घडली असून तेथे सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केला आहे.
आपल्या घरातील मुलीशी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरूणाची हत्या केली. कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं. जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे प्रेमविवाह केलेल्या २६ वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलंय. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.
हे वाचलं का? – नाशिक हादरलं! अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी मुकेश शिरसाट आणि पुजा सोनावणे यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागातील रहिवासी होते.मुकेश आणि पुजा यांनी यांनी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेमविवाह केला. पण पूजाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हंत. घरच्यांच्या विरोधात जाऊन पुजाने मुकेशसोबत लग्न केल्याने तिच्या कुटुंबियांच्या त्यांच्यावर राग होता. मुकेश हातमजुरी करून संसार चालवायचा. तर पुजाही घरकाम करून संसाराला हातभार लावत होती.
दुसरीकडे लग्नाला तीन-चार वर्षे लोटूनही पूजाच्या माहेरच्यांकडून सातत्याने वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही गेले. पूजाच्या घरचे वारंवार तिला आणि मुकेशला जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. पण कौटुंबिक वादामुळे पोलिसांनी कोणतीही कठोर भूमिका न घेता दोन्ही कुटुंबियातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पण मुकेशच्या काटा काढायचाच हे पूजाच्या माहेरच्यांच्या डोक्यात होते.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
सोमवारी (२० जानेवारी) मुकेश कामासाठी घरातून बाहेर पडला असतानाच पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशवर धारधार शस्त्राने वार केले. मुकेशला वाचवण्यासाठी गर्भवती पूजाने घरातून बाहेर धाव घेतली तर तिच्यावरही वार करून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी मुकेशच्या कुटुंबियांवरही हल्ला केला. सुदैवाने पूजा बचावली. पण आपल्याच माहेरच्यांनी मुकेशची हत्या केली आणि आपल्यावरही वार केले,असा आरोप पूजाने केला आहे.
मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्या लोकांनी हत्या केल्यामुळे जळगावात खळबळ पसरली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार ते पाच जणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश आणि पूजा यांना तीन वर्षांची मुलगी असून पूजा गर्भवती आहे. अशा परिस्थितीत मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अमानवी कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मुकेशच्या बहिणीने हल्लेखोरांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


