
वैजापूर। Vaijapur
तहसीलदारांनी वाळूचे वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने नैराश्याच्या भरात एकाने शिऊर पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना १० जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
दरम्यान घटनेनंतर रुग्णास वैजापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गणेश बाबासाहेब गडकर (रा. उंदीरवाडी) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
हे वाचलं का? – वैजापुरातील एमआयटी पॉलिटेक्निकची चौकशी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०४ जानेवारी रोजी तहसीलदार सुनील सावंत यांनी तालुक्यातील भायगावगंगा येथे वाळूचे वाहन पकडून तेथील पोलिस पाटलांच्या हवाली केले. वाहन पकडल्यानंतर तहसीलदार सावंत यांनी गणेश गडकरला दंडाची नोटीस पाठवून दंड भरण्याचे सुचविण्यात आले. नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे दोन ब्रास वाळूचा दंड भरावयास सांगण्यात आले.
परंतु तहसीलदारांनी नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या वाहनात दीडच ब्रास वाळू होती. त्यामुळे दोन ब्रासचा दंड का भरू? असे गडकरचे म्हणणे झाले. त्यामुळे गडकर याने नैराश्याच्या भरात शिऊर पोलिस ठाण्यात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यामुळे त्याच्या तोंडातून फेस आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
यानंतर शिऊर पोलिसांनी तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान पोलिस ठाण्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश गडकर याच्याविरुद्ध शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार सुनील सावंत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा नेमका काय प्रकार आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही.
हे वाचलं का? – तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
तहसीलदारांनी वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने गणेश गडकर याने पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय देशमुख, (प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक, शिऊर)
तहसीलदारांनी माझ्या भावाचे वाळूचे वाहन पकडून दोन ब्रास वाळूच्या दंडाची नोटीस बजावली. परंतु या वाहनात दीडच ब्रास वाळू होती. त्यामुळे दोन ब्रास वाळूचा दंड का भरायचा? या नैराश्याच्या भरात माझ्या भावाने विषारी औषध प्राशन केले.
महिपाल गडकर, (विषारी औषध प्राशन करणाऱ्यांचा भाऊ) रा. उंदीरवाडी
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


