HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! नागपुरात आढळले २ रुग्ण

करोनाच्या व्हायरसला यशस्वीरीत्या पराभूत करण्यात जगाला यश आलं असलं, तरी आता पुन्हा एकदा चीनमधूनच आलेल्या एका नव्या विषाणूने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये HMPV या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही HMPV ची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.

नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा रिपोर्ट ३ जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण त्यांना आधी स्वाइन फ्लू झाला होता. त्यानंतर ३ जानेवारी रोजी PCR टेस्ट केल्यावर या दोन्ही मुलांना HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं.

या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती मिळत आहे. खाजगी रुग्णालयातून हे रिपोर्ट घेण्यात आले आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून याची जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल. त्यानंतरच हे रुग्ण HMPV असल्याचं स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

HMPV व्हायरस नेमका काय आहे?

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वेगानं पसरतो. तो फुफुस्सांमध्ये वेगानं पसरतो आणि त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका असतो. परिणामी श्वास घ्यायलाही त्रास होते. छाती भरुन येते, लहान मुलं आणि वृद्धांना हा व्हायरस जास्त प्रभावित करतो. सगळ्यात आधी २००१ साली या व्हायरसची ओळख पटली होती. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंक दिल्याने तसंच त्याच्याशी हात मिळवल्याने किंवा त्याला स्पर्श केल्यानेही पसरू शकतो. एचएमपीव्ही व्हायरसने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसांनंतर या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात.

काय आहेत HMPV व्हायरसची लक्षणं?

डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्हिडीओमध्ये HMPV व्हायरसची लागण झाल्यास दिसणाऱ्या लक्षणांचा उल्लेख केला आहे. हा कोविडसारखाच असला तरी कोविडच्या गटातला नाही. त्याची तीव्रता कोविडपेक्षा कमी आहे. त्याचा मृत्यूदरही कमी आहे. करोना विषाणूच्या गटापेक्षा या विषाणूचा गट वेगळा आहे. न्यूमोव्हिरीडी नावाच्या गटातला हा विषाणू आहे. याची बाधा झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं अशी लक्षणं दिसतात. याची तीव्रता वाढत गेली, तर न्यूमोनिया होण्याचीही लक्षणं दिसून येतात. यातही ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. पण हा तितका धोकादायक नाही, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का? –  धक्कादायक! राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षणानं संपवलं जीवन, खिशात सापडली चिठ्ठी, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

तसेच साधारण ५ ते १० दिवसांत हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती व इतर काही औषधं घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते. या विषाणूवर अजूनही कोणतंही औषध नाही. पण हा विषाणू आपल्याला आधीपासूनच माहिती असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस लवकर येईल. त्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही. याचे प्रतिबंधात्मक उपाय करोनासारखेच आहेत. उदा. मास्क घालणं, गर्दीत न जाणं, इतरांपासून अंतर ठेवणं, साबण-पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात सतत स्वच्छ करणे. हा करोनाइतका धोकादायक नसला, तरी आपण सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे, असंही डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

जर तुम्हाला HMPV व्हायरसपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात दही आणि किमची सारख्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. या पदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते. थंड वातावरणात संसर्ग टाळण्यासाठी आहारात हळदीच्या दुधाचे सेवन करा. तुम्ही आल्याचा चहा प्या. हे दाहक-विरोधी पेये रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि रोग टाळतात. आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा. हिवाळ्यात अंडी, कडधान्ये, दही असे प्रथिनेयुक्त पदार्थ खा. हे सर्व पदार्थ शरीराला ऊर्जा देतील आणि शरीर निरोगी ठेवतील. हिवाळ्यात शरीर हायड्रेट ठेवा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट पाणी प्या. ग्रीन टी आणि तुळशीचा चहा घ्या. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच या पेयांमुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. सूप, हर्बल चहा आणि कोमट पाण्याचे सेवन करा. हे घश्याला आराम देण्यास मदत करतात.

जीवनशैलीत बदल करा

  • हिवाळ्यात उन्हात वेळ घालवा. मशरूम आणि मासे यांसारखे व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा.
  • चांगली झोप घ्या. दररोज रात्री ७-८ तासांची झोप घ्या.
  • शरीर सक्रिय ठेवा. योगासने आणि व्यायाम करा.
  • वारंवार हात धुवा. या टिप्सचा अवलंब केल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि एचएमपीव्ही विषाणूपासून संरक्षण करण्यात मदत होईल.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here