Nagpur Crime news : लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात धक्कादायक घटना घडली आहे. एका इंजिनीयर तरुणाने आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे. तरुणाने आई वडिलांची हत्या करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये ही घटना घजली आहे. मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे मृत आई वडिलांचे नावे आहेत. उत्कर्ष डाखोळे असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना मुलगा उत्कर्ष (२४) आणि मुलगी सेजल (२१) अशी दोन मुले होती. उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो तर मुलगी बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिकते. उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षांपासून वारंवार नापास होत होता. त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईने त्याला बैलवाड्याला असलेली त्यांची शेती कसण्यास सांगितले होते.

हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?

वडिल लीलाधर यांनीही इंजिनिअरिंग झेपत नसेल तर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा सल्ला मुलाला दिला होता. त्यामुळे त्याला आईवडिलांचा राग आला. घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात येत होते. २५ डिसेंबरला वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेतीवर जाण्यास सांगितले. आईने त्याची बॅग भरुन ठेवली होती. आता इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागेल, अशी भावना त्याच्या मनात आल्यामुळे तो अस्वस्थ होता.

आईवडिलांमुळे आपल्या शैक्षणिक भवितव्याचे वाटोळे होणार या भावनेने उत्कर्ष अस्वस्थ होता. त्यामुळे त्याने आईवडिलांचा काटा काढण्याचा कट रचला. गेल्या २६ डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आई व्यस्त होती. उत्कर्षने आईचा दोन्ही हातानी गळा आवळून खून केला. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. तासाभराने त्याचे वडिल घरी आले. त्यांना घरातील घटना पाहून धक्काच बसला. ते सोफ्यावर बसलेले असताना उत्कर्षने मागून येऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह घरात ठेवून उत्कर्ष घर बंद करुन बाहेर निघून गेला.

हे वाचलं का? – ना हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाखांची मागणी, उपसरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल

वडिलांची हत्या केल्यानंतर त्यानं बहिणीला आई-वडील मेडिटेशन करिता बेंगळूरूला गेल्याचं सांगितले. बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर ही घटना उघडकीस आली. मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच भीती पसरली आहे. दोघांच्या मृत्यने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन मुलाने धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here