
नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे आरीफ बामणे याचा काल मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली होती. त्यात दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली. यामध्ये प्रवाशांचा जीव देखील गेला होता. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर १०० जणांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात स्वतःचा जीव धोक्यात घालून १५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे ‘देवदूत’ आरीफ बामणे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला.
आरीफ हे पूर्वा बोटीवर बोटमास्टर असून ही दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर त्यांची बोट होती. आरीफ यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली आणि किमान ३५ प्रवाशांचे प्राण त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवले. पायलट बोटीचा आधार घेत त्यांनी ३५ प्रवाशांना वासुदेव फेरीबोटीत सुरक्षितरीत्या नेले. तसेच एका साडेतीन वर्षीय चिमुकलीला देखील आरिफ यांनी जीवनदान दिले. बोटमास्टर आरिफ आणि त्यांचे सहकारी कर्मचारी किफायत मुल्ला, तपस कार, नंदू जाना यांना शिवसेनेच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस देऊनही सन्मानित करण्यात आले.



