
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दोन महिलांना मारहाण करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधीत पीडित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात दोन तरूणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राहुरी तालुक्यातील एका गावात राहणार्या 37 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब विठ्ठल बंगे (रा. देहरे ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या गुरूवारी (19 डिसेंबर) सकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांच्या वडिलांच्या घरासमोरचे अंगण झाडत असताना भाऊसाहेब बंगे तेथे आला. त्याने फिर्यादीला तु मला आवडतेस असे म्हणून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘तु जर याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझा काटा काढील’ अशी धमकी दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार मिसाळ करत आहेत.
नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शुभम जाधव (पूर्ण नाव नाही, रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (19 डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर असताना शुभम जाधव तेथे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भागवत करत आहेत.



