
पुणे । Pune
अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं आहे. छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे रामदास आठवले देखील नाराज आहेत. त्यांनी देखील दोन मंत्रिपदाची मागणी केली होती. तसेच त्यांच्या पक्षाला मंत्रिपदासहित शपथविधीचं आमंत्रणही मिळालं नव्हतं. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठवले यांची माफी मागितली आहे. मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्यांना संधी मिळाली नाही, असे महायुतीचे काही नेते नाराज आहेत त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नाही, असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.


