वैजापूर । दीपक बरकसे

लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जनतेच्या विकासासाठी येणारा पैसा जातो कुठे, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र, वैजापूर तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चक्क विकासाच्या नावाखाली ‘भ्रष्टाचाराची गंगा’ वाहिल्याचा संशय व्यक्त होत आहे. सन २०२१ ते २०२६ या कार्यकाळात सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे आणि बोगस बिलांच्या आधारे केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप खुद्द उपसरपंचांनीच केला आहे. या तक्रारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वीरगाव-मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भरत शिवाजी कदम यांनी वैजापूरचे गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कदम यांच्या दाव्यानुसार, गेल्या पाच वर्षांत पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. केंद्र सरकारच्या ‘ई-ग्राम स्वराज्य’ आणि ‘माझी पंचायत’ या पोर्टल्सवर उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास केला असता, धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

तक्रारदाराने पुराव्यांसह असा दावा केला आहे की, केवळ नाली दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर इतक्या मोठ्या प्रमाणात काम झाले आहे का? हा मोठा प्रश्न आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून कामांचे अस्तित्व नसतानाही बिले काढण्यात आल्याचा संशय कदम यांनी व्यक्त केला आहे. या एका कामावरून ग्रामपंचायतीच्या इतर सर्व कामांवर संशयाची पाल चुकचुकत आहे.

सरपंच आणि ग्रामसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मासिक सभा, विशेष सभा आणि चक्क ग्रामसभांमध्येही बोगस ठराव पारित केल्याचा संशय तक्रार अर्जात नमूद करण्यात आला आहे. अनेक कामे पूर्ण न करताच त्यांची पूर्णत्वाची प्रमाणपत्रे जोडून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. “शासनाचा निधी हा जनतेच्या घामाचा पैसा आहे, तो अशा प्रकारे लाटणे हा गंभीर गुन्हा आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने त्याची चौकशीही तितकीच पारदर्शक व्हावी, अशी मागणी भरत कदम यांनी केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी उच्च दर्जाच्या निष्पक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करून, तक्रारदाराच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ चौकशी करावी, जेणेकरून सत्य समोर येईल आणि पुराव्यांशी छेडछाड होणार नाही, असे अर्जात म्हटले आहे.

ग्रामविकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात गावपातळीवर अशा प्रकारे निधीचा अपहार होत असेल, तर तो चिंतेचा विषय आहे. आता या अर्जावर वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काय कारवाई करतात आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. भ्रष्टाचाराच्या या आरोपांमुळे वीरगाव आणि मुर्शदपूर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here