छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात एका परप्रांतीय मजूर मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीचा वैजापूर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला आहे. बिहारमधून रोजगारासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला लुटून त्याची सुटका करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे शहरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामासाठी बिहार राज्यातील अनेक मजूर वैजापूरमध्ये वास्तव्यास आहेत. ४ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास, इम्रान अलीम अन्सारी हा १९ वर्षीय मजूर तरुण वैजापूर शहरातील झगडा फाटा परिसरात मासे खरेदी करण्यासाठी गेला होता. मासे घेऊन परतत असताना बोथरा पेट्रोल पंपाजवळ एका दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याला अडवले. काही समजण्याच्या आतच या त्रिकुटाने इम्रानला बळजबरीने दुचाकीवर बसवले आणि अज्ञात स्थळी पळवून नेले.

अपहरणकर्त्यांनी इम्रानला ताब्यात ठेवल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकांना फोन केला आणि १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही धक्कादायक माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून वैजापूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. खंडणी मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून आरोपींनी इम्रानला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील २ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३०० रुपये रोख, ३ हजार रुपयांची चांदीची चैन आणि १ हजार रुपयांचे डिजिटल घड्याळ असा एकूण ६,३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. अखेर रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास आरोपींनी इम्रानला कोपरगाव रोडवरील डावाळा फाटा येथे सोडून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी तीन विशेष तपास पथके तयार केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून इम्रानला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. पीडित मुलाच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १४०(१), ३०९(१) आणि ३(५) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकांनी शहराचे प्रवेशद्वार आणि गुन्ह्याच्या मार्गावरील सुमारे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. सायबर शाखेच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी सापळा रचून शिवम सुभाष सुरडकर (वय ३१ वर्ष, रा. बर्डी मस्जिद, वैजापूर) आणि सचिन बाळू गोरे (वय २९ वर्ष, रा. मसनखाई, वैजापूर) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्यातील तिसरा साथीदार सचिन मुरलीधर पवार (रा. खंडोबा नगर, वैजापूर) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करत आहेत.

परराज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांना अशा प्रकारे लक्ष्य केले जाणे ही गंभीर बाब होती, मात्र वैजापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपी गजाआड झाले आहेत. या यशस्वी कामगिरीत सपोनि विजय देशमुख, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, सायबर शाखेचे योगेश तरमाळे, अमोल कांबळे, अभिजित डहाळे, प्रशांत गिते, सचिन रत्नपारखे, उमेश जमदाडे, अजित नाचण आणि कैलास चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. “शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही,” असा इशारा पोलीस प्रशासनाने या कारवाईच्या निमित्ताने दिला आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here