
देशाची राजधानी दिल्ली दहशतवादाच्या भीषण हल्ल्याने हादरली आहे. जवळपास १४ वर्षांनंतर दिल्लीत झालेल्या या कार बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि नागरिकांच्या मनात भीतीचे मोठे सावट निर्माण केले आहे.
ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात आतापर्यंत १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने केवळ राष्ट्रीय राजधानीतच नव्हे, तर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या स्फोटाचे धागेदोरे थेट पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी जोडले गेले असून, देशात घातपात घडवणाऱ्या एका मोठ्या ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
लाल किल्ल्याजवळील स्फोटाची माहिती समोर येताच, दिल्ली पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात असून, या स्फोटाचा संबंध फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटापूर्वीच तीन डॉक्टरांसह सात संशयितांना अटक करण्यात आली होती. यामध्ये लखनौ येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर शाहीन शाहीद या महिला डॉक्टरचाही समावेश आहे, जिचे थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
तपास यंत्रणांच्या या महत्त्वपूर्ण कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका ‘व्हाइट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचे जैशच्या ‘जमात उल मोमिनत’ या महिला विंगमध्ये भारताची प्रमुख म्हणून काम करत होती, हे उघड झाले आहे. भारतातील दहशतवादी गटात जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेणे, हेच तिचे प्रमुख ध्येय होते.
डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे एका मोठ्या कटाचा पर्दाफाश होणार असल्याची तीव्र शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही महिला डॉक्टर काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये संशयित भूमिकेसाठी सहभागी होती. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या महिला डॉक्टराच्या कारमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. डॉ. शाहीन शाहीद ही दहशतवादी शकीलची गर्लफ्रेंड असून, ती सोबत AK-47 घेऊन फिरायची, ही माहिती सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत धक्कादायक होती.
डॉ. शाहीनच्या अटकेमुळे हे प्रकरण एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, देशभरात पसरलेल्या एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्यासोबत वेगवेगळ्या भागातून आणखी सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये फरीदाबाद येथे राहणारा काश्मीरचा रहिवासी असलेला डॉ. मुझम्मिल गनी याचाही समावेश आहे.
पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत एकूण २९०० किलो विस्फोटके जप्त करण्यात आली आहेत, जी देशात मोठे घातपात घडवण्यासाठी वापरली जाणार होती. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलीस दलांसह केंद्रीय एजन्सींच्या संयुक्त तपासात हे मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. लेडी डॉक्टर शाहीनला अटक केल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी श्रीनगरला आणण्यात आले आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा संबंध याच फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेला चौथा डॉक्टर मोहम्मद उमर हाच स्फोट झालेल्या i20 कारमध्ये मारला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. स्फोटापूर्वी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती, तर चौथा डॉक्टर स्फोटात मारला गेला, यावरून हे दहशतवादी मॉड्यूल किती गंभीर होते, याची कल्पना येते. सध्या पोलीस आणि केंद्रीय एजन्सीकडून प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
या हल्ल्याची तयारी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काही महिन्यांनी भारतात सुरू झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचा मृत्यू झाला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मदने हा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती. पाकिस्तानी आयएसआयने त्यांना इतर मार्गांनी शस्त्रे आणि निधी पुरवल्याचे सूत्रांनी सांगितले.
तथापि, देशाच्या सुरक्षा संस्थांना पूर्वसूचना मिळाल्या होत्या, ज्यामुळे त्यांनी सर्व संशयितांचे फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्स ट्रॅक करायला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा संस्था या संशयितांवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी तातडीने अटक न करता, ते दहशतवादी हल्ल्याशी संबंधित स्फोटके आणि शस्त्रे मिळण्याची वाट पाहत होते, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करता येतील.
सुरक्षा संस्था या व्यक्तींना सामाजिक कार्य आणि धर्मादाय संस्थेच्या नावाखाली मिळत असलेल्या निधीवर देखील लक्ष ठेवून होत्या, कारण हा निधी प्रत्यक्षात स्फोटके आणि लॉजिस्टिक सपोर्टसाठी वापरला जात होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची सुरक्षा संस्थांनी वैयक्तिकरित्या ओळख पटवली आहे, ज्यात दोन डॉक्टरांचा समावेश आहे. त्यांच्या संयुक्त कारवाईत, पोलिसांनी एक चायनीज स्टार पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, एके-५६ रायफल, एके-क्रिन्कोव्ह रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. देशात दहशत निर्माण करण्यासाठी तब्बल २९०० किलोग्रॅम आयईडी बनवण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.
सध्या सुरक्षा संस्था त्यांच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपचे आयपी अॅड्रेस ट्रॅक करून आणि डिजिटल तपास करून हँडलरची नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी काम करत आहेत. तसेच, हे सर्व गट जोडलेले आहेत की भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी स्वतंत्र मॉड्यूल म्हणून काम करत आहेत, हे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटाने केवळ १२ निष्पाप जीवांचा बळी घेतला नाही, तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर आव्हान उभे केले आहे, ज्याचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



