
नाशिकमध्ये भाजपचे पदाधिकारी शरद फडोळ यांना फोनवरून जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजप पदाधिकारी शरद फडोळ हे गुरुवारी (दि. ९) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घरी असताना ही घटना घडली. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन केला आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या व्यक्तीने गोळीबार करून ठार मारण्याची थेट धमकी दिल्याने फडोळ यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
या प्रकारानंतर शरद फडोळ यांनी त्वरीत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (Non-Cognizable) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सोमनाथ गुंड करत आहेत.
पोलिसांनी या धमकी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फडोळ यांना धमकी देणारा व्यक्ती कोण आहे आणि त्याने कुणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या धमकीमागील नेमके कारण आणि राजकीय संबंध शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड मोहीम (Crackdown Campaign) सुरू आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून, आयुक्तांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
एकीकडे पोलिसांची ही उल्लेखनीय कामगिरी सुरू असताना, दुसरीकडे एका राजकीय पदाधिकाऱ्याला फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताने एक प्रकारे नाशिक पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. या धमकीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या गुन्हेगाराला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.



