येडूआई यात्रेच्या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला; ज्ञानेश्वर अहिरे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्रभरातील लाखो आदिवासी भिल्ल बांधवांचे श्रद्धास्थान आणि अकोले तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडू मातेच्या यात्रेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून यात्रेच्या जागेवरून सुरू असलेला वाद आणि भाविकांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांची दखल घेत, अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेच्या जागेचा सविस्तर पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला असून, यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळदरी येथील येडू मातेची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून, तो राज्यातील भिल्ल समाजाच्या अस्मितेचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, या यात्रेकरूंच्या वाट्याला गेल्या अनेक वर्षांपासून केवळ संघर्ष आणि हाल अपेष्टाच येत होत्या. देवस्थानची जमीन वन विभागाच्या अंतर्गत असूनही, आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत.

यात्रेच्या वेळी लाखोंचा जनसमुदाय जमल्यानंतर त्यांना राहण्यासाठी, नवसपूर्ती करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नव्हती. नाईलाजास्तव भाविकांना खाजगी शेतकऱ्यांच्या शेतात आश्रय घ्यावा लागत होता, ज्यातून स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्यात वारंवार खटके उडत होते. या संघर्षाचे रूपांतर अनेकदा वादात होत असल्याने यात्रेच्या पावित्र्याला गालबोट लागत होते, ही बाब अत्यंत गंभीर होती.

या प्रकरणातील धक्कादायक वास्तव म्हणजे, वन विभागाच्या जमिनीवर यात्रा भरत असतानाही काही घटकांकडून यात्रेवर अवैधपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. भाविकांकडून जमिनीच्या वापरापोटी पैसे उकळणे, मंदिर विकासाच्या गोंडस नावाखाली बेकायदेशीर पावती फाडणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.

या अन्यायाविरुद्ध एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी कंबर कसली. त्यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत, यात्रेच्या चार दिवसांच्या कालावधीसाठी येडू आई गड परिसर पूर्णपणे आरक्षित करण्याची मागणी केली. प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष जागेची विचारणा केली असता, अहिरे यांच्यासह राधाकृष्ण बर्डे, अनिल बर्डे व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जवळपास ३० एकर जागेचा आराखडा प्रशासनासमोर मांडला.

जिल्हाधिकाऱ्यांनी आता या संपूर्ण ३० एकर जागेचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे आता यात्रेच्या जागेचा नेमका सरकारी रेकॉर्ड तयार होईल आणि भविष्यात होणारी लूट थांबण्यास मदत होईल. शासकीय यंत्रणेने या जागेचा ताबा घेऊन तिथे भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास, येणाऱ्या काळात ही यात्रा अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पडेल. हा केवळ जागेचा प्रश्न नसून आदिवासींच्या श्रद्धेचा आणि सन्मानाचा विजय मानला जात आहे.

ज्ञानेश्वर अहिरे यांनी केलेल्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे पिंपळदरी परिसरातील अतिक्रमणांचा विळखा सैल होणार असून, आगामी यात्रेमध्ये आदिवासी बांधवांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला शेतकरी विरुद्ध आदिवासी हा संघर्ष कायमस्वरूपी मिटण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल पडले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता येडू आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही मानसिक किंवा आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here