राजकारण म्हणजे केवळ आश्वासनांचे डोंगर रचणे किंवा व्यासपीठावरून शब्दांची जुगलबंदी करणे नव्हे, तर जनतेने टाकलेल्या विश्वासाला प्रत्यक्ष कामातून आणि धडाकेबाज निर्णयांतून परतफेड करणे होय. हाच विचार घेऊन आम्ही आजवर काम केले आहे आणि भविष्यातही जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे ठाम आणि स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

निवडणुकीतील जय-पराजय बाजूला सारून जनसेवेचे व्रत त्यांनी अखंडपणे सुरू ठेवल्याचे यावेळी दिसून आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, ALIMCO, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र आणि ब्राम्हणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधन वाटप तसेच विविध विकास कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी ब्राम्हणी गावचे ज्येष्ठ नेते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, विक्रमराव तांबे, विजयराव बानकर, उत्तमराव आढाव, उत्तमराव म्हसे, शरद पेरणे, रविंद्र म्हसे, सिताराम ढोकणे, अमोल भनगडे, आर आर तनपुरे, धनंजय आढाव, आशिष बिडकर, अनिल आढाव, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर, सरपंच सुवर्णा बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, मधुकर पवार, किशोर वने, उत्तम खुळे, गिरीराज तारडे, भानुदास मोकाटे, दिलीप तारडे, अनिल ठबे, बाळासाहेब जाधव, अरुण बानकर, अशोक नगरे, समीर पठाण, नंदु शिंदे यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी, पत्रकार, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिवंगत नेते स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी म्हंटलं , कर्डिले साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठी अक्षरशः समर्पित केले. त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू कधीही निवडणूक जिंकणे किंवा कोणतेही मोठे पद मिळवणे नव्हते. तर, जनतेचे प्रश्न मार्गी लावणे आणि विकासाला गती देणे हेच त्यांचे खरे राजकारण होते. आज ब्राम्हणी गावात जो दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक साधन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, याची संकल्पनाही साहेबांचीच होती आणि ती आज प्रत्यक्षात उतरलेली पाहून मनस्वी समाधान वाटत असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले. कर्डिले साहेबांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

आपले कार्य थांबले नाही, हे ठामपणे सांगताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांतील आपल्या कामाचा आणि कार्यक्षमतेचा वस्तुपाठच सादर केला. खासदारकीच्या निवडणुकीत व्यस्त असतानाही, अवघ्या सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला असून, या एकाच महिन्यात दीड लाख टनांहून अधिक उसाचे गाळप केले जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. “मी आज जरी माजी खासदार असलो, तरी शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर नेण्याचे आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे साहित्य, साधने सातत्याने पुरवण्याचे काम मी थांबवणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम केल्याचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, खासदार किंवा मंत्री ही सर्व पदे केवळ आणि केवळ जनतेची सेवा करण्यासाठीच असतात. जनतेने दिलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग हा केवळ सर्वसामान्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे, हा राजकीय सेवाभावाचा मंत्र त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. दिव्यांग बांधवांना आज मिळालेले साहित्य त्यांच्या योग्य वापरात यावे, हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम जरी अत्यंत आनंदाचा असला, तरी कर्डिले साहेब आज आपल्या सोबत नाहीत याची उणीव प्रत्येक क्षणाला जाणवत आहे. हा संपूर्ण उपक्रम साहेबांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला होता. ब्राम्हणी गावावर त्यांचे अपार प्रेम होते आणि ब्राम्हणीतील कोणताही नागरिक कुठल्याही मदतीसाठी त्यांच्याकडे आल्यास, साहेबांनी कधीही नकार दिला नाही. आजपर्यंत साहेबांकडे ठेवलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आता युवा कार्यकर्त्यांवर येऊन ठेपली आहे. कर्डिले साहेबांचे अखंड आशीर्वाद आणि डॉ. सुजय विखे पाटील तसेच पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे योग्य मार्गदर्शन हीच आपली खरी ताकद आहे, असे त्यांनी यावेळी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने राहुरी तालुका व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्डिले साहेबांना सर्वाधिक प्रिय असणारी गोष्ट म्हणजे जनतेत मिसळून त्यांच्या समस्या ऐकणे, जनता दरबार घेणे आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे. त्याच सामाजिक विचारांवर चालत, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करत राहण्याचा भावनिक शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here