
राहाता । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला “बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४” मध्ये प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार जाहीर करून गौरविले आहे. या गौरवामुळे, राज्याचे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महायुती सरकारने टाकलेल्या पावलांना आणखी बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार म्हणजे केवळ जलसंपदा विभागाचा नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा सन्मान आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. २०२४ साली जलसंपदा विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. त्यांच्या कार्यकाळात विभागाने जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच महाराष्ट्र राज्याला हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे.
मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या या यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीच्या नियोजनाला दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली कामात अतिशय पारदर्शकता, तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. धरण सुरक्षा, जलसंवर्धन, सिंचन प्रकल्पांना गती देणे आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर यांसारख्या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी घेतलेल्या ठोस निर्णयांचे प्रतिबिंब या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमातील सर्व प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी देखील राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विभागाचा केलेला हा गौरव म्हणजेच दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेले थेट राष्ट्रीय पाठबळ आहे, अशी भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. या पुरस्कारात विभागातील सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला आणि त्यांचे आभार मानले.
हा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापन क्षेत्रातील शिस्त आणि कार्यक्षमतेची पोचपावती असून, भविष्यात सिंचन सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विभागाला प्रोत्साहन देणारा आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



