
मायेच्या पाझराची आणि नात्यातील विश्वासाची मूर्तीमंत प्रतिमा म्हणजे आई-वडील. पण जेव्हा हेच नाते रक्ताचे आणि क्रौर्याचे ठरते, तेव्हा समाजमन सुन्न होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने याच नात्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याला मुळा नदीच्या पुलावरून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद झालेल्या या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ काही दिवसांतच छडा लावला असून, या क्रूर कृत्यामागे खुद्द चिमुकल्याचे आई-वडीलच असल्याचे उघड झाले आहे. हा उलगडा झाल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे.
४ डिसेंबर रोजी सकाळी ९.१६ वाजता आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना घारगाव येथील मुळा नदीच्या पुलाखाली, काटेरी झुडपांमध्ये एका अंदाजे तीन ते चार महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि तात्काळ घारगाव पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली.
मृतदेह अनोळखी असल्याने, या संवेदनशील प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री मिटे अशा तज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आणि त्यांना तपासासाठी रवाना करण्यात आले.
पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत बालकाची बारकाईने पाहणी केली असता, हा केवळ ‘अकस्मात मृत्यू’ नसून, त्यामागे घातपात असण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून आली. मयत बालकाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर असलेले व्रण क्रूरतेची साक्ष देत होते. या माहितीच्या आधारावर, पथकाने घटनास्थळाच्या आसपास ये-जा करणाऱ्या वाहनांच्या मार्गाचे आणि पुलावरील हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण सुरू केले. याचदरम्यान, गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करत, पथकाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार जालना जिल्ह्यातील आव्हाना (ता. भोकरदन) येथील असल्याची महत्त्वाची माहिती मिळवली. या माहितीमुळे तपासकार्याला मोठी गती मिळाली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरामध्ये जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र, आशासेविका आणि इतर गोपनीय स्त्रोतांकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. या तपासात त्यांना धक्कादायक बाब समोर आली. कविता प्रकाश जाधव या महिलेच्या नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले असून, त्याला तीन ते चार दिवसांत रुग्णालयातून सोडणार असल्याची अफवा परिसरामध्ये पसरवल्याची माहिती पथकाला मिळाली.
ही अफवा आणि मुळा नदीच्या पुलाखाली सापडलेल्या मृत बालकाचे वय यात साम्य असल्याने, पोलिसांचा संशय अधिकच बळावला. यानंतर, पथकाने तत्काळ कारवाई करत, प्रकाश पंडित जाधव (वय ३७, रा. भिवपूर, पो. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना), त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव (वय ३२, रा. सदर) आणि हरिदास गणेश राठोड (वय ३२, रा. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने, तिघांनाही स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे आणून बारीकसारीक मुद्यांवरून कसून विचारपूस करण्यात आली. पोलिसांच्या तपासाच्या आणि प्रश्नांच्या माऱ्यापुढे आरोपींचा खोटेपणा फार काळ टिकला नाही. अखेरीस, प्रकाश जाधव याने आपला गुन्हा कबूल केला.
त्याने सांगितले की, ‘शिवांश उर्फ देवांश’ नावाचा आपला मृत मुलगा आणि पत्नी कविता हिला सोबत घेऊन, मित्र हरिदास गणेश राठोड याच्या कारमधून (क्र. एमएच. ०२. ईएच. ५३५४) ३ डिसेंबर २०२५ रोजी पुणेच्या दिशेने जात असताना, त्यांनी घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलावर गाडी थांबवली. बाळ बरे होणार नाही या अत्यंत क्षुल्लक आणि क्रूर कारणावरून, गाडीचा चालक (हरिदास गणेश राठोड) आणि प्रकाश जाधव या दोघांनी खाली उतरून, बाळाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, बाळाच्या अंगावरील कपडे काढून, त्याचा निष्पाप मृतदेह त्यांनी पुलावरून खाली फेकून दिला.
या घृणास्पद घटनेनंतर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार (क्र. एमएच. ०२. ईएच. ५३५४) तत्काळ ताब्यात घेतली आहे. तपासाअंती, मयत बाळाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने, घारगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०३(१) (हत्या) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ते या क्रूर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पालकांच्या ममतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कायद्याने अशा गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



