
इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी जिल्ह्यात 17 हजार 658 विद्यार्थी बसले आहेत. उद्या (रविवारी) जिल्ह्यातील 47 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
गेल्या वर्षीपासून या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. 2022-23 मध्ये 13 हजार 479 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 608 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. गेल्यावर्षी 2023-24 मध्ये 17 हजार 747 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 487 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. येत्या रविवारी होणार्या परीक्षेला 17 हजार 658 विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेसाठी बौध्दिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर आहेत. पेपर क्रमांक 1 बौध्दिक क्षमता चाचणी परीक्षा सकाळी 10.30 ते 12 व पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी परीक्षा दुपारी 1.30 ते 3 या वेळत होणार आहे.
या परिक्षेचे नियोजन करण्यात आले असून 47 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई असे 950 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्त करण्यात आली आहे. आठवीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख 50 हजार असणे आवश्यक आहे. त्याचा दाखल तहसीलदारांकडून मिळाला पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.
12 हजार रूपये शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी 12 हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. याबरोबरच जे विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र होत नाहीत. मात्र केवळ उत्तीर्ण होतात. अशा मराठा, कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या संवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी या संस्थेमार्फत वार्षिक 9 हजार 600 रूपये रक्कम दिली जाते.



