वैजापूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर येथील खंडोबानगर येथे पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीचा पर्दाफाश करत मोठ्या प्रमाणात जनावरांच्या हाडांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, खंडोबानगर येथे काही नागरिकांनी एक बोलेरो पिकअप वाहन (MH 43 BG 2658) अडवले आहे. वाहनात अवैधरीत्या गोवंश मांसाची वाहतूक होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता, वाहनात जनावरांचे हाड, कवटी, शिंगे, बरगडी यांचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी वाहन चालक याकुब साबेर कुरेशी (वय 26, रा. येवला रोड, वैजापूर) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुन्यांचे संकलन करण्यात आले.

सदर प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा 1995 आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याविरोधातील अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here