
बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. हत्येमागील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. काल (४ जानेवारी) परभणीमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा निघाला.
या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. तेव्हा जमलेल्या जमावासमोर बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती. हरामखोर अवलादीचे म्हणत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन बीडच्या परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
हे वाचलं का? – …तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरकू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट इशारा
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन बोलताना जरांगे म्हणाले की, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. याच भाषणात बोलताना “मुंडया-फिंड्या, हरामखोर अवलादी” असे शब्दप्रयोगही केले होते.
धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला. याच्या निषेधार्थ आज (रविवार) सकाळपासून परळी पोलिस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले आणि घोषणाबाजी केली. मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



