
कळवण तालुक्यातील निवाने येथे आयडीएफसी फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून शेतमजुरावर तलवारीने प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. जखमी युवकावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर जखमी युवकांच्या फिर्यादीवरून आयडीएफसी बँकेच्या कर्मचारी व त्याच्या साथीदारांवर कळवण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे.
कळवण तालुक्यातील निवाने येथे शेतमजुरी करणारा किसन नामदेव बोरसे (२४) याच्या आईने देवळा येथील असणारी आयडीएफसी फायनान्स बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. दोन वर्षापासून कर्जाचे हफ्ते नियमित भरले जात असताना काही कारणास्तव मागील महिन्याचा एक हफ्ता भरला गेला नव्हता. त्यामुळे काल (दि.२) रोजी आयडीएफसी फायनान्स बँकेचा वसुली कर्मचारी बाळासाहेब उत्तम पाथरे रा. वायगाव ता. सटाणा तसेच त्याचा साथीदार मंगेश साहेबराव आहिरे व भाऊ शरद उत्तम पाथरे रा. नाशिक यांनी शेत मजूर किसन बोरसे याच्याकडे पैशांची मागणी केली.
हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?
यावेळी किसन बोरसे याने त्यांना दुपारी तीन वाजता तुम्हाला पैसे देतो असे सांगितले. त्यानुसार संबंधित तीनही आरोपी हे दारू पिऊन तीन वाजेच्या आतच किसन बोरसे याच्या घरी जाऊन पैशांची मागणी करू लागले. यावेळी किसन बोरसे याने अजून पैशांचे काम झालेले नसून थोड्या वेळाने तुम्हाला पैसे देतो असे सांगितले. परंतु हे तीनही आरोपी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेतमजूर किसन बोरसे यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण करू लागले. हप्त्याचे पैसे आम्हास आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊ लागले.
त्यांनी सोबत आणलेल्या टाटा कंपनीच्या नेक्सन कार क्रमांक (एमएच १५- जेएम-९३८३) या गाडीतून आरोपी शरद उत्तम पाथरे याने तलवार काढत किसन बोरसे याच्या डोक्यात तसेच पाठीवर वार करीत प्राणघातक हल्ला करून त्यास जबर जखमी केले. ही वार्ता वाऱ्यासारखी निवाने गाव व परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दहशत माजविणाऱ्या या तीनही कर्मचाऱ्यांना चोप देत कळवण पोलिसांच्या स्वाधीन केले.
हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह
दरम्यान जखमी अवस्थेत असणाऱ्या किसन बोरसे यास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत तर आयडीएफ सी फायनान्स बँकेचा कर्मचारी बाळासाहेब उत्तम पाथरे त्याचा भाऊ शरद उत्तम पाथरे व त्यांचा साथीदार मंगेश साहेबराव आहिरे यांच्यावर कळवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (५), तसेच सशत्र अधिनियम (आर्म अॅक्ट) ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोळंके हे करीत आहेत. दरम्यान कळवण तालुक्यात आयडीएफसी फायनान्स बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी केलेल्या या दहशतीमुळे एकच खळबळ माजली आहे.
गोरगरीब व गरजू नागरिकांनी अशा फायनान्स बँकेकडून कर्ज घ्यावे की नाही असा प्रश्न उपस्थित राहत आहे. कळवण तालुक्यात असे बरेच फायनान्स कंपन्यानी महिलांचा एक ग्रुप तयार करून त्यांना कमी व्याजाचे आमिष दाखवून कर्ज देत आहेत. त्यांच्या भूलथापानां महिला बळी पडत असून सदर महिलांकडून याच प्रकारे दहशत निर्माण करून किंवा दादागिरी करून पैशांची वसुली करण्याचे काम फायनान्स कंपन्याकडून सुरु आहे. तरी अशा फायनान्स कंपन्यावर शासनाने निर्बंध लावावा अशी मागणी जोर धरत आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



