
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती.
यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?
पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केला जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायभसे यानी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, त्याला बीड प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे वाचलं का? – ना हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाखांची मागणी, उपसरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणाचा तपास एस आय टी, सीआयडी करत असली तरी तरीही अटक पोलिसांनी बीडच्या स्थानिक पोलीस यांनी केलेली आहे. लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील. यासंदर्भातली लवकरच पत्रकार परिषद होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील, गेल्या २६ दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते. जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या. मात्र, आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, हे प्रकरण उचलून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दोघा मुख्य आरोपींना अटक झाली, असा प्रश्न विचारला असता, सुरेश धस म्हणाले, की अजून एक राहिला ना… कृष्णा आंधळे… आणि सुदर्शन घुले हा काही मु्ख्य आरोपी नाही, प्यादं आहे. मुख्य आरोपी पोलिसांनी शोधला पाहिजे. मुख्य आरोपी आका आहे. ज्यांचा उल्लेख मी आका करतो, तो संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. घुले-सांगळेला फक्त सांगितलं, जाओ ऐसा ऐसा करो. सुदर्शन घुले फक्त अंमलबजावणी करणारा आहे, असं सुरेश धस म्हणाले.



