
छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकरच्या निर्घृण हत्येने देशात खळबळ उडाली आहे. ‘बस्तर जंक्शन’ नावाने युट्युब चॅनेलच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात पत्रकारिता करणाऱ्या मुकेशचे देशभर फॉलोवर्स होते. मुकेश दोन दिवसांपासून बेपत्ता होता. ३ जानेवारीला बिजापूर चट्टानपारा येथील एका घरामागील सांडपाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.
पत्रकार मुकेश चंद्राकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती. अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले. यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्याच्या घरामागील सांडपाण्याच्या टाकीत मुकेशचा मृतदेह आढळून आला.
हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?
दरम्यान पोलिसांनी मुकेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्व वैमनस्यातून कंत्राटदार सुरेश चंद्राकर याने मुकेशची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार आहे. त्याचा धाकटा भाऊ रितेश चंद्राकर दिल्लीला पळून गेला आहे. त्यांची कार रायपूर विमानतळावर उभी असलेली आढळून आली. मात्र, पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांनाही ताब्यात घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, “विजापूर येथील तरुण आणि समर्पित पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मुकेशजींच्या निधनाने पत्रकारिता आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. याप्रकरणी गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. तशा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत.
हे वाचलं का? – ना हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाखांची मागणी, उपसरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल
काही महिन्यांपूर्वी बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी एका जवानाचे अपहरण केले होते. त्यावेळी पत्रकारांच्या मध्यस्थीने जवानाची सुटका करण्यात आली. या पत्रकारांमध्ये मुकेश चंद्राकर हा तरुण पत्रकार अग्रणी होता. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पत्रकारितेकडे वळलेल्या मुकेशने अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचे ‘बस्तर जंक्शन’ हे यूट्यूब चॅनल देशभर बघितल्या जाते. बस्तरमधील नक्षलवाद आदिवासींच्या समस्या त्याने हिरिरीने जगापुढे आणल्या.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



