
वैजापूर । दीपक बरकसे
सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने वैजापूर तालुक्यातील शेकडो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणांना उत्तराखंडमध्ये नेऊन एका इमारतीत डांबून ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील काही तरुणांनी कसाबसा आपला जीव वाचवून घर गाठले असून, रविवारी (५ एप्रिल) वीरगाव पोलीस ठाण्यात ३० ते ४० तरुणांनी धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील आणि शहरातील अनेक तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर तालुक्यातील छत्रपूर गावात बोलावून घेण्यात आले. तेथे गेल्यावर आरोपींनी प्रत्येक तरुणाकडून ३५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात उकळली. सुरुवातीला त्यांना प्रशिक्षणाचे (ट्रेनिंग) कारण सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात हे प्रशिक्षण नसून एक चेन मार्केटिंगचे रॅकेट असल्याचे तरुणांच्या लक्षात आले.
या रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणांना नवीन मुले जोडण्यासाठी ‘सायकॉलॉजी’चे (मानसशास्त्र) विशेष वर्ग घेतले जायचे. आपल्या मित्रांना किंवा इतर तरुणांना जाळ्यात कसे ओढायचे, त्यांच्याशी बोलताना चेहऱ्यावरचे हावभाव कसे असावेत आणि संभाषणाचे तंत्र कसे असावे, याचे प्रशिक्षण दिले जात होते. प्रत्येक नवीन तरुण जोडल्यावर अडीच हजार रुपये कमिशन देण्याचे प्रलोभनही दाखवले गेले. जेव्हा तरुणांनी याला विरोध केला, तेव्हा त्यांना बाहेर जाण्यास मनाई करून एका इमारतीत डांबून ठेवण्यात आले.
फसवणूक झालेल्या तरुणांनी सांगितले की, त्यांना वेगवेगळ्या इमारतींमध्ये गटागटाने ठेवले जायचे. एका इमारतीतील मुलांना दुसऱ्या इमारतीतील मुलांशी भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नव्हती. घरून नातेवाईकांचे फोन आल्यावर आरोपी सांगतील तसेच बोलावे लागायचे. तेथून सुटका करून घेणे अत्यंत कठीण होते, मात्र काही तरुण तिथून पळून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी घरी परतल्यानंतर पालकांना सर्व हकीकत सांगितली आणि पोलिसांकडे धाव घेतली.
अजूनही वैजापूर आणि परिसरातील अनेक तरुण उत्तराखंडमध्ये आरोपींच्या ताब्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून शेकडो तरुणांचे भविष्य आणि पैसे धोक्यात आले आहेत. “आमची सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली असून आम्हाला तिथे ओलीस ठेवल्यासारखे वागवले गेले,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित तरुणांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या प्रकरणाबाबत वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले की, “तरुणांकडून आम्हाला लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परवानगीने आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” या घटनेमुळे वैजापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.



