डीपीवर काम करताना विजेचा धक्का लागून कंत्राटी वायरमनचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरातील बीएसएनएल रोड परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भूमी अभिलेख कार्यालयासमोर असलेल्या विद्युत रोहित्रावर (डीपी) दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका २९ वर्षीय कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोमनाथ आसाराम पानडघळे (वय २९, रा. आघुर) असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ हे महावितरणमध्ये कंत्राटी झिरो वायरमन म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीएसएनएल ऑफिस रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयासमोर असलेल्या विद्युत रोहित्रात बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सोमनाथ खांबावर चढले होते. नियमानुसार काम सुरू करण्यापूर्वी वीज पुरवठा खंडित करण्याचे ‘परमिट’ घेण्यात आले होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक विद्युत तारांमध्ये वीज प्रवाह उतरला. सोमनाथ यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खांबावरच अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलीस, नगर परिषद आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. यावेळी अनिल राऊत, मोहन तुपे आणि रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी जिवाची पर्वा न करता सोमनाथ यांना विद्युत खांबावरून खाली उतरवले. त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सोमनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक आणि आघुर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात धाव घेतली. अधिकृत परमिट घेतलेले असताना वीज प्रवाह आलाच कसा, असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. जनरेटरमधून ‘रिटर्न सप्लाय’ आल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक चर्चा घटनास्थळी सुरू होती.

ही घटना महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच घडली असल्याचा आरोप करत, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यामुळे काही काळ महावितरण कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत जमावाची समजूत काढली आणि रीतसर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर जमाव शांत झाला. तरुण वायरमनचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने आघुर परिसरात शोककळा पसरली असून, कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here