
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर शहराच्या पुरणगाव रोड परिसरात मध्यरात्री उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून डिझेल चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यवसायासाठी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चालकाला या चोरीमुळे आर्थिक फटका बसला आहे. शहरात रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सहकुल हाकम खान वद्य (वय २९), व्यवसाय चालक, रा. राहेरी, जि. नेवासा, राज्य हरियाणा, सध्या कुटुंबासह वास्तव्यास असून टाटा कंपनीची मालवाहू गाडी क्रमांक NL 01 AG 4796 चालवून उपजीविका करतात. ते दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता गुजरात येथून कर्नाटककडे माल घेऊन प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजता वैजापूर शहरातील पुरणगाव रोडजवळ त्यांच्या वाहनात बिघाड झाला. वाहन बंद पडल्याने त्यांनी तेथील सुरक्षित जागी वाहन उभे केले.
रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीची सोय न झाल्याने सहकुल खान यांनी वाहनातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. रात्री सुमारे १२.०० वाजता ते वाहनात झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ६.०० वाजता उठून त्यांनी वाहनाची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वाहनाच्या डिझेल टाकीचे झाकण तुटलेले आढळले. टाकी तपासली असता त्यामध्ये डिझेल पूर्णपणे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेत वाहनातील एकूण १६० लिटर डिझेल चोरीस गेल्याचा अंदाज असून, प्रति लिटर ९० रुपये दराने या डिझेलची एकूण किंमत सुमारे १४ हजार ४०० रुपये इतकी आहे. ही चोरी दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२.०० ते दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने डिझेल टाकीचे झाकण तोडून लबाडीच्या हेतूने स्वतःच्या फायद्यासाठी डिझेल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी सहकुल खान यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तक्रार दाखल केली असून, चोरीस गेलेल्या डिझेलचा तसेच आरोपीचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, महामार्गालगत व शहराच्या बाहेरील भागात उभ्या असलेल्या वाहनांवर होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



