शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजारातील घसरते दर आणि शासनमान्य हमीभाव यामधील तफावत या मुद्द्यांवर वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मका आणि कापूस या प्रमुख शेतमालाच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी ही बैठक निर्णायक ठरली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या जा.क्र. 962, दिनांक 8 डिसेंबर 2025 नुसार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरच्या मार्केट यार्डमधील सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वैजापूर यांचे प्रतिनिधी, सहाय्यक निबंधक, बाजार समितीचे सभापती, संचालक, सचिव, शेतकरी प्रतिनिधी तसेच मका खरेदीदार व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत प्रामुख्याने मका व कापूस शेतमालाची खरेदी शासनमान्य हमीभावाने करण्यात यावी, या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. निवेदनकर्ते किशोर मगर यांनी मका शेतमालाचा हमीभाव 2400 रुपये प्रति क्विंटल असताना लिलावात प्रत्यक्ष दर 1200 ते 1300 रुपये इतका कमी मिळत असल्याचे स्पष्टपणे मांडले. यावर बाजार समितीच्या सचिवांनी माहिती देताना सांगितले की, आज वैजापूर बाजार समितीत मका कमाल 1830 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला आहे.

यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी आपली बाजू मांडताना सांगितले की, मका खरेदी करणाऱ्या कंपन्यांचे सध्याचे दर 1875 ते 1900 रुपये प्रति क्विंटल इतकेच आहेत. अशा परिस्थितीत जर व्यापाऱ्यांनी 2400 रुपये दराने मका खरेदी केला, तर तो मका त्याच दराने विक्री करणे व्यवहार्य ठरणार नाही. इतर बाजार समित्यांमध्येही साधारणपणे असेच दर असल्याचे त्यांनी नमूद केले.

या चर्चेनंतर बाजार समितीचे सभापती व संचालकांनी शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मका खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती दिली. ज्यांना आपला मका शासनमान्य हमीभावाने विक्री करायचा आहे, त्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

बैठकीत लिलावाबाहेर सुरू असलेल्या खेडाखरेदीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. या अनधिकृत खरेदीवर निर्बंध आणावेत, अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून करण्यात आली. त्यावर बाजार समिती प्रशासनाने पुढील काळात शासकीय प्रतिनिधींसह भरारी पथक तयार करून तालुक्यातील खेडाखरेदीवर कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केवळ बाजार समितीच्या आवारातच विक्री करावा यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात येतील, अशी माहिती दिली.

शेतकरी प्रतिनिधी प्रकाश ठुबे यांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी ठाम भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मका शेतमालाच्या बाजारभाव व शासनमान्य हमीभावातील तफावत लक्षात घेता, शासनाने प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा अहवाल तहसीलदार वैजापूर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

या बैठकीस बाजार समितीचे सभापती रामहरी (बापू) जाधव, संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप, कल्याणराव पाटील जगताप, विजय (उल्हास) ठोंबरे, प्रशांत पाटील सदाफळ, सौ. अनिता वाणी, सहाय्यक निबंधक किरण चौधरी, पुरवठा निरीक्षक ऋतुजा खेडकर, सचिव प्रल्हाद मोटे, सहाय्यक सचिव एस. के. निकम, निरीक्षक दिपक शिंदे तसेच अनेक व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here