
वैजापूर । दीपक बरकसे
Summary :
- पोलिसांकडून सक्तीचे आदेश
- 70 जणांना शहरातून हद्दपार
- कायदा हातात घेणाऱ्यांना 364 दिवस नाचवणार; पोलिसांचा मंडळांना सज्जड दम
विसर्जन मिरवणुकीत डीजे, लेझर लाईटसह कोणत्याही इलेक्ट्राँनिक वाद्य अथवा सामुग्रीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशी सक्त ताकीद उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी गणेश मंडळाच्या बैठकीत दिली. ३० ऑगस्ट रोजी येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात ही बैठक पार पडली. बैठकीला पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पोनि ताईतवाले यांनी सांगितले की, डीजेच्या दणादणाटामुळे ‘श्री’ स्थापनेच्या दिवशी शहरातील एका सात वर्षीय मुलीचा कानाचा पडदा फाटला. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री व पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी देखील डीजे मुक्त गणेश विसर्जन पार पाडावे याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत कुणीही कायदा हातात घेऊन डीजे वाजविण्याचा अट्टाहास करू नये जो कुणी डीजे वाजवून कायदा हातात घेईल त्याच्यासह डीजेवर देखील रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल.
कायदा हातात घेणाऱ्यांना ३६४ दिवस नाचऊ…
या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत जो कुणी कायदा हातात घेऊन पोलिसांशी अरेरावी करेल त्याला आम्ही ३६४ दिवस कायद्याच्या तालावर नाचऊ अशी तंबी देत यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३०, शिऊर हद्दीतील २० तर विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २० असे तब्बल ७० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान गणेशत्सोव काळात गणेश मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर करून पारंपारिक वाद्यांसह गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यँत..
विसर्जन मिरवणूक ही रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार असून जितक्या लवकर मिरवणुकीस सुरुवात होईल तितका जास्त आनंद गणेश मंडळांना घेता येईल. याशिवाय विसर्जन मिरवणुकीत ‘आम्ही पुढे अन तुम्ही मागे’ अशा प्रकारचा कुठलाही वाद खपवून घेतला जाणार नाही. ‘जो अगोदर येईल तोच सर्वात पुढे राहील’ अशी देखील सूचना पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात या बैठकीत देण्यात आल्या.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



