
वैजापूर । दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील बोर-दहेगाव मध्यम प्रकल्पातून अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे एक दुर्दैवी घटना घडली असून करंजगाव येथील वृद्ध शेतकरी नदीत वाहून जाऊन मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जलसंपदा विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता धरणातून पाणी सोडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास जलसंपदा विभागाकडून बोर-दहेगाव मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग बोर नदीच्या पात्रात करण्यात आला. मात्र नदीकाठच्या गावांना किंवा शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. अचानक सोडलेल्या या पाण्यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास करंजगाव येथील ७४ वर्षीय शेतकरी भानुदास गंगाधर मगर यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला.
भानुदास मगर हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बैलगाडीने बोर नदी ओलांडून आपल्या शेतात गेले होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी ते घरी परतत असताना नदीत पाण्याचा प्रवाह अचानक वाढलेला असल्याचा त्यांना अंदाज आला नाही. नदी ओलांडत असतानाच पाण्याचा वेग वाढल्याने त्यांची बैलगाडी, बैल आणि सोबत असलेली गाय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या घटनेत बैल कसेबसे वाचले, मात्र भानुदास मगर आणि त्यांची गाय पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच करंजगाव येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी तत्काळ नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने मगर यांचा मृतदेह करंजगाव शिवारातील बोर नदीवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली गायही मृतावस्थेत आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या घटनेमुळे करंजगाव आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. धरणातून पाणी सोडताना संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांना कोणतीही सूचना न दिल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ करंजगावचे ग्रामस्थ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनाजी पाटील मिसाळ यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने बोर-दहेगाव धरणातून पाणी सोडताना स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ किंवा शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. जर योग्य वेळी सूचना दिली असती, तर शेतकरी भानुदास मगर यांचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे या प्रकरणात जलसंपदा विभागाचे संबंधित अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यापूर्वी संबंधित विभागाने ग्रामस्थांना वेळेवर सूचना देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



