
वैजापूर । दिपक बरकसे
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन संशयित चोरट्यांना वैजापूर पोलिसांनी रात्रभर कसून शोध घेत अटक केली आहे. हरियाणा पासिंगच्या संशयित कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत एकूण ४ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वैजापूर पोलिसांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही थरारक घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वैजापूर येथील मोंढा मार्केटजवळील एसबीआय (SBI) बँक शाखेजवळ हरियाणा पासिंगची एक संशयित स्विफ्ट कार (क्र. HR 93 B 6557) असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळाली. कारमधील व्यक्तींची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने, तात्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक ताईतवाले यांनी त्वरित उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलीस हवालदार अविनाश भास्कर, लगाने, पोलीस शिपाई मेटे आणि विघे यांच्या पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांचे पथक बँकेसमोर पोहोचताच, आरोपींना त्याची चाहूल लागली. त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ आपली स्विफ्ट कार रोटेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळवून नेली.
हे ही वाचा : आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने…; इन्स्टाग्रामवरील लव्ह स्टोरीचा भयानक The end!
रोटेगावपुढे जरूळ फाट्यावरून आरोपींनी कार पुन्हा वैजापूर शहराच्या दिशेने वळवली. ही माहिती मिळताच, निरीक्षक ताईतवाले यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान, संशयित कार जीवनगंगा सोसायटीमधून जुन्या आघुर रोडमार्गे जेजुरकर वस्ती येथे एका शेताजवळ पोलिसांना थांबलेली दिसली.
पोलिसांच्या पाठलागामुळे आरोपी त्यांची कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नलवडे, पाडळे, नरोटे, हवालदार नरवडे, पोलीस शिपाई दाभाडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार शेख, पाटील, राठोड, शिपाई बहुरे यांच्या पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर, पहाटेच्या सुमारास तिडी मकरमतपूर शिवारात हे पथक शोध घेत असताना, तिडी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ दोन संशयित आरोपी पोलिसांना दिसले.
पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपी पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख उघड केली: मोहमंद कैफ नजमोद्दीन (वय २१, रा. उलेटा, ता. फिरोजपूर, जि. नुहु, हरियाणा), आझाद इमरु खान (वय २४, रा. झारोकशी, ता. पुनहना, जि. नुहु, हरियाणा) या दोघांनीही कार (HR 93 B 6557) आपलीच असल्याचे आणि गाडीत असलेले त्यांचे इतर तीन साथीदार पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा : ‘आध्यात्मिक’ गुरुकुलात ‘विकृत’ कृत्य! कोकरे महाराज अन् शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिसांनी आरोपींची आणि त्यांच्या कारची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे अनेक साहित्य आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक काळा स्प्रे, हातोडी, गुप्ती, सुरी, साखळी बॅटरी, रस्सी, स्क्रू ड्रायव्हर, दोन काळ्या रंगाच्या पट्ट्या, आठ एटीएम कार्ड, तीन मोबाईल आणि २२ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. याशिवाय, त्यांची स्विफ्ट कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ८७ हजार ७५० रुपये आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या आंतरराज्यीय टोळीतील दोन सदस्यांना अटक करून पोलिसांनी एक मोठा गुन्हा रोखला आहे. वैजापूर पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि रात्रभर केलेल्या अथक परिश्रमामुळेच ही कारवाई यशस्वी झाली, त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



