
वैजापूर । दीपक बरकसे
शहर स्वच्छ, नीटनेटके आणि कचरा-मुक्त ठेवण्यासाठी वैजापूर नगरपालिकेने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. नुकतेच मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरभर स्वच्छतेची मोहीम राबवली जात असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नगरपालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील कचऱ्याचे ढिगारे साफ करण्यास सुरुवात केली असली तरी, काही बेजबाबदार नागरिक अजूनही उघड्यावर कचरा टाकत असल्याचे समोर आले आहे. गंगापूर रोडवरील ओपन स्पेसवर मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. तपासात हा कचरा याच परिसरातील ‘अजित कलेक्शन’ नावाच्या दुकानातून टाकण्यात आल्याचे उघड झाले.
मुख्याधिकारी बिघोत यांनी तत्काळ पथकासह हा कचरा पुन्हा संबंधित दुकानात आणून ठेवला आणि त्या दुकानावर १,००० रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये जागृतीसह स्वच्छतेबाबत गांभीर्य वाढण्याची अपेक्षा आहे.

शहरातील अनेक ठिकाणी अद्यापही उघड्यावर कचरा टाकण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारे नियमभंग केल्यास दंडाची रक्कम वाढवली जाईल आणि वारंवार नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही मोहीम सातत्याने राबवण्यात आल्यास, शहरातील कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर कमी होतील आणि स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.



